मुंबई: वृत्तसंस्था । योगगुरु रामदेव बाबा यांचं कोरोना व्हायरसवरचं कोरोनील औषध बाजारात आलं आहे. राज्य सरकारने मात्र या औषधाला महाराष्ट्रात विक्रीस मनाई केली आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून रामदेव बाबांना मोठा झटका दिला आहे. पतंजलीच्या कोरोनील औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर आयएमएने प्रश्न उपस्थित केले असून जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा हे औषध कोरोनावर परिणामकारक असल्याचा पतंजली आयुर्वेदचा चुकीचा दावा फेटाळला आहे.
घाईने हे औषध बाजारात आणण आणि दोन ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी याला समर्थन देणं योग्य नाही, असं सांगतानाच जागतिक आरोग्य संघटना आणि आयएमए व इतर संबंधित सक्षम आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय पतंजलीच्या कोरोनील औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही, असं देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे रामदेव बाबांची चांगलीच कोंडी झाली आहे.
रामदेव बाबांनी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन आणि नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत कालच कोरोनील या औषधाचं लाँचिंग केलं. “गर्वाचा क्षण…. पतंजलीद्वारे कोव्हिड 19 च्या करिता पहिलं प्रमाणित औषध सादर करताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे”, असं पतंजली आयुर्वेदने ट्विट करुन म्हटलं आहे. आम्ही योग आणि आयुर्वेद यांना समांतर पातळीवर पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. कोरोनिल कोट्यवधी लोकांना जीवन देतं आहे. आता वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे आम्ही लोकांना ज्या शंका होत्या त्या दूर केल्या आहेत, असं पतंजलीने म्हटलं आहे.
या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेचं प्रमाणपत्र मिळाल्याचं म्हटलं. त्यानंतर थेट जागतिक आरोग्य संघटनेनेच आपण अशा कोणत्याही पारंपारिक/आयुर्वेदीक औषधाची तपासणी केलेली नाही आणि प्रमाणपत्र दिलेलं नाही असं स्पष्ट केलं. इंडियन मेडिकल असोसिएशननेदेखील रामदेव बाबांच्या या दाव्यावर आक्षेप घेतला. पतंजलीचं औषध कोरोनापासून संरक्षण करत असेल तर मग कोरोना लसीकरणावर ३५ हजार कोटी रुपयांचा खर्च कशासाठी असा प्रश्न विचारलाय.
कोरोनीलवरुन झालेला वाद वाढताना पाहून पतंजलीने यावर स्पष्टीकरण दिलंय. पतंजलीचे आचार्य बालक्रिष्ण म्हणाले, “आम्ही काही गोष्टी स्पष्ट करु इच्छितो. आमच्या औषधाला मिळालेलं प्रमाणपत्र जागतिक आरोग्य संघटनेने दिलेलं नाही. हे प्रमाणपत्र भारत सरकारच्या विभागाने दिलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं आमच्या औषधाला मंजूरी दिलेली नाही किंवा नाकारलेलं देखील नाही.