Home आरोग्य कोरोना संकटात राज्यात आरोग्य खात्यात १६ हजार पदे भरणार

कोरोना संकटात राज्यात आरोग्य खात्यात १६ हजार पदे भरणार


 

मुंबई : वृत्तसंस्था । राज्यात कोरोनाच्या संकटामुळे नागरिक त्रस्त असताना लॉकडाउनच्या निर्बंधांमुळे अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. आता काही लोकांसाठी रोजगाराची आशा निर्माण झाली आहे  आरोग्य विभागात १६ हजार पदांची भरती केली जाणार असल्याची माहिती  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली

 

यामध्ये क आणि ड वर्गातील एकूण १२ हजार पदं, ब वर्गातील २ हजार पदं आणि २ हजार विशेषज्ञांचा समावेश  आहे. येत्या आठवड्याभरात यासंदर्भातली शासन पातळीवरची निर्णय प्रक्रिया पार पाडली जाईल आणि त्यानुसार भरती प्रक्रियेला सुरुवात केली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनामुळे बेरोजगारी किंवा आर्थिक अडचणीचा सामना सुरू असताना हा काही प्रमाणात दिलासा मानला जात आहे.

 

पुढील निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आरोग्य विभाग, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना देण्याचा ठराव मंत्रिमंडळ बैठकीत झाल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. “मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही सांगितलं की रुग्णसेवेशी संबंधित पदांची १०० टक्के भरती करण्याची आवश्यकता आहे. कॅबिनेटने ठरवलं आहे की आता आरोग्य विभाग, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या स्तरावर हा निर्णय येत्या २ ते ३ दिवसांत घेतला जाईल. तातडीने परीक्षा घ्याव्यात असं देखील ठरवण्या आलं आहे”, असं टोपे म्हणाले.

 

कोणत्या वर्गासाठी किती जागांची भरती केली जाईल, याची देखील माहिती राजेश टोपे यांनी दिली. “१२ हजार क आणि ड वर्गातील जागा, २ हजार ब वर्गातील डॉक्टर-मेडिकल ऑफिसर आणि २ हजार स्पेशालिस्ट यांच्या जागा भरण्याचा निर्णय आपण घेत आहोत. त्याची शासन स्तरावरील कारवाई आठवड्याभरात पूर्ण होईल. त्यानंतर क आणि ड वर्गासाठी एजन्सीच्या माध्यमातून परीक्षा घेतली जाईल. आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या माध्यमातून ब वर्गाच्या मुलाखती घेतल्या जातील. तर अ वर्गासाठीचे सिलेक्शन एमपीएससीकडे पाठवले जातील”, असं टोपे यावेळी म्हणाले.

 

देशात तिसरी लाट अटळ असल्याचा इशारा नुकताच केंद्र सरकारच्या विज्ञानविषयक सल्लागारांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड, रेमडेसिविर अशा सर्वच कमतरता असणाऱ्या गोष्टींवर काम करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.  तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य सेवेतील कर्मचारी, तज्ज्ञ आणि डॉक्टर-नर्सदेखील पुरेशा संख्येत असणं आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर  राज्य सरकारकडून तातडीने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत असल्यामुळे कोरोनाचा अधिक सक्षमपणे सामना करता येईल असं सांगितलं जात आहे.

 

बुधवारी दिवसभरात ५७ हजार ६४० नव्या बाधितांची नोंद करण्यात आली त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत संख्या ४८ लाख ८० हजार ५४२ झाली आहे. यापैकी ६ लाख ४१ हजार ५९६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातल्या एकूण मृतांचा आकडा ७२ हजार ६६२  झाला आहे. राज्याचा मृत्यूदर १.४९ टक्के नोंदवण्यात आला आहे.

 


Protected Content

Play sound