बुलडाणा प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी अनेक उपाययोजना होत असतांना याच कारणामुळे जिल्ह्यातील सैलानी बाबा यांची यात्रा स्थगित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
जगभरात फैलाव झालेल्या कोरोना विषाणूचा प्रसार भारतात काल आढळलेल्या रूग्णांवरून झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. अत्यंत वेगाने फोफावणार्या कोरोना विषाणूचा प्रसार वेळीच नियंत्रणात आणणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर व्यापक उपायोजना करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने निर्देश जारी केलेले आहेत. तसेच राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी कोरेाना विषाणू प्रसाराबाबत यंत्रणांच्या तयारी बाबत संबंधित अधिकारी यांची दूरचित्रवाणी परिषद घेतली. त्यामध्ये कोरोना विषाणू प्रसारा संदर्भात राज्यात होणारे यात्रा, उत्सव आदींना आवश्यकते प्रमाणे पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याबाबत जिल्हा स्तरावर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने बुलडाणा जिल्ह्यात प्रसिद्ध सैलानी बाबांची यात्राही कोरोना विषाणू प्रसाराबाबत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्थगित करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
विभागीय आयुक्त पियुष सिंग यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल, भूसंपादन आदी विषयांबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विभागीय आयुक्त यांनी कोरेाना विषाणू प्रसार संदर्भात सैलानी यात्रा नियोजन बैठकही घेतली. या यात्रेच्याअनुषंगाने संबंधित अधिकार्यांना यावेळी बैठकीला बोलाविण्यात आले. बैठकीला जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, सांकेतिक जिल्हाधिकारी पदावर असलेल्या साक्षी सतिष वैराळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ, मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन एस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत, उपवनसंरक्षक श्री. माळी, सैलानी ट्रस्टचे विश्वस्त व संबंधीत प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख आदी उपस्थित होते.
दरम्यान, सैलानी यात्रेत सध्या आलेल्या भाविकांना परत जाण्याची विनंती प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. यासाठी त्यांना जाण्या- येण्यासाठी परिवहन व्यवस्था करण्यात येईल. कोरेाना विषाणू प्रसारासाठी प्रतिबंधात्मक उपाय महत्वाचे आहेत. त्याकरीता नवीन भाविक यात्रेत येवू नये, म्हणून जाणीव जागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील रेल्वे स्थानक व जालना रेल्वे स्थानकावर सैलानी यात्रा स्थगीत झाल्याचे फलक लावण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जाणीव जागृती करण्यात येणार आहे. सैलानी यात्रेत देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक येतात. यापैकी कुणीही भाविक कोरोना विषाणूने बाधीत असल्यास त्याची लागण अन्य भाविकांमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखणे, याबाबत अफवा पसरवू नये हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. तसेच सैलानी यात्रेत येणार्या भाविकांनी यात्रेकरीता येवू नये, असे आवाहनही प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.