कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरीकांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

 

जळगाव (प्रतिनिधी) कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले असतांना आपल्या देशात या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासन तसेच जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. या उपाय योजना नागरीकांच्या सुरक्षिततेसाठीच असल्याने नागरीकांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे.असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हावासियांना केले आहे.

 

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन केला आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी येथील जिल्हा नियोजन भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त सुशील कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे, जिल्हा नियेाजन अधिकारी प्रतापराव पाटील, गुरुमुख जगवाणी आदि उपस्थित होते.

 

पालकमंत्री पुढे म्हणाले की, कोरोनाचा अद्याप एकही संशयित आपल्या जिल्ह्यात आढळून आलेला नाही हे आपल्यासाठी आशादायी चित्र असून यापुढेही नागरीकांनी शिस्त व सुचनांचे पालन करुन काही दिवस घरातच राहिल्यास आपण हे संकट निश्चितपणे टाळू शकतो. तसेच अशाप्रसंगाला तोंड देण्यासाठी दानशूर व्यक्तींनी मुख्यमंत्री सहायता निधीस सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले.

 

यावेळी जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांनी लॉकडाऊनबाबत केंद्र शासनाकडून प्रापत झालेल्या सुचनांची माहिती देतांना माध्यमांनी नागरीकांमध्ये कोरोना विषाणूविषयी जनजागृती करण्याचे आवाहन केले. तसेच जिल्ह्यात अन्नधान्य, भाजीपाला, दूध आदि जीवनावश्यक वस्तुंचा कुठलाही तुटवडा नाही. तसेच यापुढेही भासणार नाही याबाबत प्रशासन आवश्यक ते नियोजन केले आहे. भाजी विक्रेत्यांनी एकाच ठिकाणी गर्दी करु नये. अंतर ठेवून विक्रीसाठी बसावे. अथवा हातगाडीवर चौकाचौकात जाऊन भाजीची विक्री करावी. जिल्ह्यातील 3 उप जिल्हा रुग्णालये, 18 ग्रामीण रुग्णालये आहेत. याठिकाणी ग्रामीण भागातील नागरीकांनी तपासणी करावी. आवश्यकता भासली तरच जिल्हा रुग्णालयात यावे, आपतकालीन परिस्थितीत जिल्ह्यात 2 हजार व्यक्तींना क्वांरटाईन करता येईल असे प्रशासनाचे नियोजन आहे. तसेच देशावर आलेल्या संकटाच्यावेळी दुकानदारांनी सेवेची संधी घ्यावी कमाईची नाही असे आवाहन करुन त्यांनी जीवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. विनाकारण कोणाला त्रास होणार नाही याची दक्षता पोलीसांनी घ्यावी. तसेच लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहने जळगाव जिल्ह्यात येवू नये याकरीता जिल्ह्यात 31 तपासणी नाके उभारण्यात आले आहे. ज्या तपासणी नाक्यावरुन बाहेरील इतर वाहने जिल्ह्यात येतील तेथील तपासणी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.

 

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 190 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून 29 व्यक्तीचे स्वॅप तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 27 जणांचे नमुने निगेटिव्ह आले असून 2 जणांचे अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. तसेच बाहेर गावांहून आलेल्या प्रत्येकी व्यक्तीची कोरोना तपासणी करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे नागरीकांनी घाबरुन जाऊन गावात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्याचा आग्रह धरु नये. असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचे अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे यांनी केले.

 

तत्पूर्वी जिल्हाधिकारी यांनी जिल्हास्तरीय समितीकडून जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेवून आवश्यक त्या सुचना केल्यात. त्यानंतर पालकमंत्री ना. पाटील यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट देऊन कोरोना विलगीकरण कक्षाची पाहणी केली. तसेच तेथील सोईसुविधांची पाहणी केली. तसेच यंत्रणेला आवश्यक त्या सुचना दिल्यात.

Protected Content