संयुक्त राष्ट्र वृत्तसंस्था । कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करणाऱ्या लस विकसित झाल्यानंतर त्याच्या वितरणाबाबत नियोजन सुरू झाले आहे. संयुक्त राष्ट्राच्या ‘युनिसेफ’च्यावतीने लस खरेदी आणि त्याच्या वितरणाचे नेतृत्व केले जाणार त्याशिवाय लस उपलब्ध झाल्यानंतर पहिल्या टप्पातील लस सर्व देशांमध्ये सुरक्षित आणि त्वरीत व सर्वांना उपलब्ध होईल याचीही खबरदारी ‘युनिसेफ’ करणार आहे.
संयु्क्त राष्ट्र बाल निधी (युनिसेफ) ही संस्था जगातील सर्वाधिक लस खरेदी करणारी संस्था आहे. दरवर्षी जवळपास १०० देशांच्यावतीने नियमित लशीकरण आणि संसर्ग रोखण्यासाठी दोन अब्जांहून अधिक लशींची खरेदी युनिसेफकडून करण्यात येते. ‘रिवॉवल्विंग फंड ऑफ द पॅन अमेरिका हेल्थ ऑर्गेनायजेशन’च्या सहकार्याने युनिसेफ कोविड-१९ च्या लशीची खरेदी करणार असून ‘कोवॅक्स ग्लोबल वॅक्सिन फॅसिलिटी’च्यावतीने ९२ कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील देशांना लस पुरवठा करणार आहे.
८० उच्च उत्पन्न गटातील देशांसाठीच्या खरेदीसाठी समर्थन देण्यासाठी खरेदी समन्वयक म्हणूनही करणार आहे. लस खरेदी आणि वितरण योग्य पद्धतीने व्हावे या प्रयत्नात १७० हून अधिक देश आहेत. ही जगातील सर्वात मोठी लशीकरण मोहीम ठरू शकते.
युनिसेफच्या कार्यकारी संचालक हेनरिटा फोर यांनी सांगितले की, सरकार, उत्पादक आणि बहुपक्षीय सहकाऱ्यांच्या दरम्यान भागिदारीतून कोविड-१९ महासाथीच्या आजाराविरोधातील लढाई सुरू ठेवण्याचे एक अभियान आहे. जागतिक आरोग्य संघटना, ‘गावी द वॅक्सिन अलायन्स’, ‘द कॉलिशन फॉर एपिडेमिक प्रिपेयर्डनेस इनोव्हेशन’ , पीएएचओ, जागतिक बँक आणि ‘द बिल अॅण्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशन’सह इतर संस्थांच्या मदतीने युनिसेफ लस खरेदी आणि वितरण करणार आहे. . जवळपास २८ उत्पादकांनी युनिसेफसह कोविड-१९ लस उत्पादनाचे २०२३ पर्यंतचे नियोजन केले आहे.