कोरोना लस चाचणीत स्वयंसेवकाचा मृत्यू

 

लंडन/ ब्राझीलिया, वृत्तसंस्था । ब्राझीलमध्ये कोरोना लसीच्या चाचणीमध्ये सहभागी झालेल्या एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये ऑक्सफर्ड युनिवर्सिटी आपली कोरोना लस एस्ट्रोजेनिकाची चाचणी करत आहे. येथे या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरु आहे. परंतु, या घटनेनंतरही चाचणी सुरू ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

जगभरात सुरू असलेल्या लस चाचणी दरम्यानचा हा पहिला मृत्यू आहे. या २८ वर्षीय स्वयंसेवकाला चाचणी दरम्यान प्लेस्बो (खोटं औषध) देण्यात आले होते. त्यामुळे लशीमुळे त्याचा मृत्यू झाला नाही. ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाची लस सुरक्षित असून चिंतेचे कारण नसल्याचेही तज्ज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळे या लशीची चाचणी सुरूच राहणार आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार लस चाचणीत सहभागी असलेला हा २८ वर्षीय स्वयंसेवक डॉक्टर होता. कोरोना महामारीच्या काळात फ्रंटलाइनवर कार्यरत होता. कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमधील वृत्तपत्र ग्लोबो आणि आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था ब्लूमबर्ग यांनी सांगितले की, या स्वयंसेवकाला चाचणीत लस देण्याऐवजी एक प्लेस्बो देण्यात आले होते. मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या लस चाचणीत सर्वच स्वयंसेवकांना लस दिली जात नाही. काही स्वयंसेवकांना लस आणि काहींना खोटी लस दिली जाते. याची नोंद चाचणी करणाऱ्या संशोधकांकडे असते. मात्र, स्वयंसेवकांना याची कोणतीही कल्पना नसते.

या घटनेनंतर ऑक्सफर्डने म्हटले की, ब्राझीलमधील घडलेल्या घटनेचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानंतर लस चाचणीबाबत चिंता करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले. ब्राझीलमधील नियामक प्राधिकरणासह इतर स्वतंत्र तज्ज्ञांनीदेखील लस चाचणी सुरू ठेवण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे. ब्राझीलच्या राष्ट्रीय आरोग्य नियामक प्राधिकरणास या स्वयंसेवकाच्या मृत्यूबाबत १९ ऑक्टोबर रोजी कळवण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Protected Content