कोरोना लसींच्या आढाव्यासाठी ६० हून अधिक देशांचे प्रतिनिधी आज भारत दौऱ्यावर

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । जगभरातील ६० हून अधिक देशांचे प्रतिनिधी आज भारताच्या दौऱ्यावर आहेत. भारतातील आघाडीच्या कंपन्या बनवत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या निर्मितीचा ते आढावा घेणार आहेत.

पहिल्यांदा ते हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीला भेट देणार आहेत. त्यानंतर इतर शहरांमधील लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना ते भेट देतील.

परराष्ट्र मंत्रालयाने ६ डिसेंबर रोजीच या परदेशी प्रतिनिधींच्या दौऱ्याबाबत माहिती दिली होती. या प्रतिनिधींच्या पहिल्या तुकडीत ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, इराण, भूटान, ब्राझील, म्यानमार, स्लोवेनिया, त्रिनिदाद, टोबॅगो, दक्षिण कोरिया, अफगाणिस्तान, श्रीलंका या देशातील प्रतिनिधींचा समावेश असेल. अशा प्रकारच्या परदेशी प्रतिनिधींचा हा पहिलाच भारत दौरा आहे.

लुक्झेंबर्ग येथील ‘बी मेडिकल सिस्टिम’ ही कंपनी भारतात मार्चपर्यंत लसीच्या साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेजची सुविधा पुरवणार आहे. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एल. प्रोवोस्ट यांचाही या दौऱ्यात समावेश असणार आहे. प्रोवोस्ट म्हणाले, “लुक्झेंबर्गपासून भारतात कोल्ड स्टोरेजचं तंत्रज्ञान देण्यासाठी आणि निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी मी भारत दौऱ्यावर येणार आहे. या प्रकल्पासाठी आम्ही गुजरातमध्ये जागेची पाहणी करणार आहोत.”

कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे. दोशी म्हणाले, “आम्ही भारतात कोल्ड स्टोरेज साळखी तयार करणार आहोत. मार्च २०२१ पासून या प्रकल्पाला सुरुवात करण्याचा आमचा मानस आहे. यासाठी महाराष्ट्र आणि तेलंगाणा ही राज्ये आमच्या संपर्कात आहेत.”

भारत हा जगातील सर्वात मोठा लस निर्मिती करणारा देश असून कोरोना प्रतिबंधासाठीच्या जागतिक प्रयत्नांमध्ये भारताने सातत्याने आपला सहभाग नोंदवला आहे.

Protected Content