पुणे वृत्तसंस्था । कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरात लॉकडाऊन आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकड्याने ४ हजारचा टप्पा पार केला आहे. कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन देशात लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्यात आले आहे. पुण्यातील येरवडा कारागृहसह राज्यातील ५ कारागृहे लॉकडाऊन करण्यात आले आहेत. पुढील आदेशापर्यंत ही सर्व कारागृह बंद असणार आहेत.
राज्यात कोरोनाने मोठ कहर केला आहे. राज्यात आजपर्यंत मृतांचा आकडा ४ हजारांवर गेला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील कारागृहात ही लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली. मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह, कल्याण जिल्हा कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह ही पाच कारागृह बंद ठेवण्यात आली आहे.
पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातील १६० अधिकारी कारागृहातच लॉकडाऊन झाले आहेत. येरवडा कारागृहातील जेलर उमाजी पवार यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी लॉकडाऊन झाले आहेत. या ठिकाणचा कोणताही अधिकारी आणि कर्मचारी कारागृहाच्या बाहेर जात नाही. तसेच बाहेरुन कोणीही कारागृहात येत नाही. येरवडा कारागृहात साडेपाच हजार कैदी आहेत. या कैद्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. या ठिकाणी अनेक कैदी हे गंभीर गुन्ह्यातील शिक्षा भोगत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आली आहे.
पुण्यातील येरवडा कारागृहसह राज्यातील पाच कारागृहे लॉक डाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे जोपर्यंत वरिष्ठांकडून आदेश येत नाही तोपर्यंत अनिश्चित काळासाठी ही पाच कारागृहे लॉकडाऊन राहणार आहेत. यात मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह, कल्याण जिल्हा कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह या कारागृहांचा समावेश आहे.