रावेर, प्रतिनिधी । संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे देशातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा सतर्क होऊन कोरोनाला हरविण्यासाठी युद्धाच्या रणांगणात उतरली आहे.या युद्धात प्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या आरोग्य सेवकांना पीपीई – ९५ मास्क न मिळाल्याने शास्त्राविना लढाई करावी लागत असल्याचे चित्र रावेरमध्ये पाहावयास मिळत आहे.
युद्ध म्हटले म्हणजे शत्रूला हरविण्यासाठी सर्व अत्याधुनिक शस्त्रानिशी उतरावे लागते. तेव्हाच युद्धात विजय मिळवता येतो. राज्याचे आरोग्य विभागाचे आरोग्य सैनिक कंबर कसून कोरोना विरुद्धच्या या लढाईसाठी मैदानात उतरले आहेत. मात्र या सैनिकांना शासनाने कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी अत्यावश्यक असलेले पीपीई किट व एन -९५ मास्कचा पुरवठा लढाई प्रत्यक्षात सुरु होऊन वीस दिवस उलटूनही न केल्याने कोरोनाच्या युद्धात आरोग्य सैनिकांची शास्त्राविना लढाई सुरु आहे असेच म्हणावे लागेल. कोरोनाची लक्षणे असलेले अनेक रुग्ण येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी येत असतात. केवळ लक्षणावरून सदरचा रुग्ण निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह असल्याचे निदान येथील ग्रामीण रुग्णालयातील उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना करता येत नाही. मात्र संबंधित रुग्णावर उपचार करताना डॉक्टर व परिचारिका तसेच इतर कर्मचाऱ्यांचा रुग्णाशी अगदी जवळून संपर्क येत असल्याने या आरोग्य सैनिकांच्या सुरक्षिततेची कोणतीच हमी नसल्याची स्थिती आहे.
रावेरचे ७० सैनिक लढाईत
येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, परिचारिका, वार्डबॉय , वाहनचालक, यांच्यसह एकूण ७० अधिकारी व कर्मचारी आहेत. कोरोना विरुद्धची लढाई लढण्यासाठी हे सारे सैनिक तयार व तत्पर आहेत. मात्र त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेले पीपीई किट व एन ९५ मास्कचा आरोग्य विभागाने आद्यपही पुरवठा न केल्याने हे सैनिक शास्त्राविना हि लढाई लढत आहेत.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/657316008163814/