जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना पाचोरा शहरातही कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे. त्यातच दोन कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी पाचोरा येथे भेट देऊन प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली.
याप्रसंगी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्याकडून माहिती जाणून घेत प्रशासनाचा आढावा घेतला. शहरातील स्टेट बँकेजवळ आढळलेल्या कोरोणा बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या परिवारातील दोन जणांना कोरोना चा संसर्ग झाल्याचे तपासणीअंती निष्पन्न झाले आहे. त्यामुळे हा परिसरही प्रतिबंधित करण्यात आला असून त्या भागातील चाळीस जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर सिंधी कॉलनी मधील एक रुग्ण आढळून आल्याने त्या रुग्णाला व त्याच्या परिवारासह 22 जणांना विलगीकरण कक्षात उपचार व निगराणीसाठी ठेवण्यात आले आहे. हा परिसर देखील प्रतिबंधित करण्यात आला आहे. याशिवाय एका रूग्णाचा कोरोणा संसर्गाने मृत्यू झाल्यामुळे भीम नगर परिसर प्रतिबंधित करण्यात आला असून त्यांच्या परिवारातील सदस्यांना व सदर रुग्ण नोकरी करत असलेल्या आस्थापनेतील 22 कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरी विलगीकरण करून निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन तत्परतेने उपायोजना करीत असून जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, पोलीस उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकडे, नगरपालिका मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ समाधान वाघ, डॉ अमित साळुंखे, तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे आणि विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल चे संचालक डॉ. भूषण मगर तसेच सर्व प्रशासकीय यंत्रणा तत्परतेने कार्यरत आहेत.
नागरिकांनी घाबरून न जाता सावधानता पाळावी. प्रशासनाच्या निर्णयाची काटेकोर पालन करावे. लॉकडाऊनचे पालन करावे. कोणीही विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणेआणि पोलीस अधीक्षक डॉ.उगले यांनी प्रतिबंधात्मक क्षेत्राची पाहणी करून काही सुचना संबंधितांना केल्यात तसेच स्थानिक प्रशासनाने तातडीने केलेल्या उपाययोजनाबाबत समाधान व्यक्त केले.