कोरोना नियमांचे उल्लंघन : भाजपचे आ. भोळे यांच्यासह १० जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शहरातील टॉवर चौकात भाजपाने जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून आंदोलन केल्याप्रकरणी आमदार राजूमामा भोळे यांच्यासह भाजपाच्या दहा पदाधिकाऱ्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवार १९ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता बळीराम पेठ येथील भाजपा कार्यालयापासून ते टॉवर चौकात मोर्चा काढला. त्यानंतर टॉवर चौकात काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक बॅनर जाळून आंदोलन केले होते. यावेळी आमदार राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी यांच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोना काळात जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन व आंदोलन करण्याची कोणतीही परवानगी नसतांना आंदोलन केले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक नरेंद्र ठाकरे यांच्या फिर्यादीवरून रात्री ९ वाजता शहर पोलीस ठाण्यात आमदार राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक प्रभाकर सुर्यवंशी, सचिन पवार, राजेश भावसार, लालंद पाटील, तुकाराम निकम, माजी आमदार स्मिता वाघ यांच्यासह दहा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र सोनार करीत आहे.

Protected Content