लखनऊ (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशच्या बरेली येथे परराज्यातून आलेले पुरुष, महिला आणि लहान मुलांना रस्त्यावर बसवून त्यांच्यावर निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येत असलेले रसायन फवारले जात असल्याचा धक्कादायक व्हीडिओ समोर आला आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
या व्हीडिओत पोलीस मोठ्या माणसांना आणि लहान मुलांना आपापले डोळे बंद करायला लावताय. त्यानंतर या सगळ्यांवर रसायन फवारले जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हीडिओ समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाविरोधात टीकेची झोड उठली आहे. दरम्यान, या पाण्यात कोणतेही केमिकल नव्हते. त्यामुळे त्यांना अमानुष वागणूक देण्याचा आमचा कुठलाही हेतू नव्हता,असे स्पष्टीकरण स्थानिक अधिकाऱ्यांनी दिले आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.