इस्लामपूर-सांगली (वृत्तसंस्था) इस्लामपूर शहरात एकाच कुटुंबातील २३ जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर संपूर्ण इस्लामपूर शहर सील करण्यात आले आहे. कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी ही माहिती दिली.
इस्लामपूर शहरात एकाच कुटुंबातील २३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. परंतू या २३ जण ३३७ जणांच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता संपूर्ण इस्लामपूर शहर सील करण्यात आले आहे. दरम्यान, जयंत पाटील यांनी फेसबूक लाईव्हद्वारे संदेश दिला की, सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. कोरोनाशी लढण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. जिथे आहात तेथेच राहण्याचा प्रयत्न करा. सर्वांनी एकत्र येऊन लढा देणे महत्त्वाचे आहे. कृपया घराबाहेर पडणं टाळा. जीवनावश्यक वस्तूंसाठी झुंबड टाळा.