सांगली वृत्तसंस्था । देशात आणि राज्यात संचारबंदी असल्यामुळे अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तुंच्या विक्री व्यतिरिक्त सर्व काही बंद आहे. त्यामुळे दारूच्या आहारी गेलेल्या तळीरामांची सध्या घालमेल सुरू आहे. दारू मिळत नसल्याने चक्क देशी दारूचे दुकान फोडल्याचा प्रकार दोन ठिकाणी उघडकीस आला.
देशात आणि राज्यात करोनाचा प्रसार वेगानs होत असल्याचं लक्षात आल्यानंतर राज्य सरकारने संचारबंदी आदेश लागू केले. त्यानंतर केंद्र सरकारने देशभरातच लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला. यामुळे गेल्या ७ दिवसांपासून देशभरात जीवनावश्यक वस्तुंची विक्री वगळता सर्व व्यवहार ठप्प आहेत. विशेषतः मद्यपान करणाऱ्यांची या निर्णयामुळे मोठी अडचण होऊन बसली आहे. त्यामुळे तल्लफ पूर्ण करण्यासाठी आता वेगवेगळे मार्ग तळीराम स्वीकारताना दिसत आहे. अशाच दोन घटना सांगली आणि मिरजमध्ये घडल्या.
दारू मिळवण्यासाठी काही तळीरामांनी चक्क देशी दारूच्या दुकानावरच डल्ला मारला. दुकान फोडत मद्यपान तर केलच त्याचबरोबर दारुच्या बाटल्याही लंपास केल्या. ही घटना नंतर दुकान मालकाच्या लक्षात आली. पोलीसात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत काही तळीरामावर कारवाई केली.