जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा आता मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम-३० गोळ्याचे वाटप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर गोळ्या वाटपासाठी शिक्षणविभागातर्फे ४ लाख ७६ हजार रूपयांची मदत केली आहे.
जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव वाढला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांना आर्सेनिक अल्बम-३० नावाचे औषध अतिशय उपयुक्त आहे. याला आयुष मंत्रालयाने मान्यता दिली आहे. औषधी उपलब्ध होण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याने दानशुर व्यक्तींनी निधी उपलब्ध करून द्यावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने शिक्षण विभागाचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे व माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांना मदतीचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी पाच हजार रूपयांची देणगी देत मार्गदर्शन केले. या सामाजिक कार्यात दातृत्वाच्या भावनेने शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी सढळ हाताने मदत केली. सुमारे ४ लाख ७६ हजार ९११ रुपये देणगी रेडक्रॉस संस्थेला ऑनलाइन देण्यात आली. कोरोना विरूद्धच्या लढ्यात शिक्षण विभागातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी रेशन दुकान, चेक पोस्ट, हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, प्रतिबंधात्मक क्षेत्र इत्यादी ठिकाणी दिलेली जबाबदारी पार पाडत आहेत. तसेच आर्थिक योगदान ही दिले. त्याबाबत जिल्हा प्रशासनाने शिक्षण विभागाचे अभिनंदन केले आहे.