जळगाव प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज नव्याने १३ रूग्ण संशयित कोरोना म्हणून दाखल करण्यात आले आहे. आज दिवसभरात ९५ रूग्णांचे स्क्रिनिंग करण्यात आले त्यातील १३ जणांना संशयित म्हणून दाखल केल्याची माहिती शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. खैरे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
१४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात कोविड-१९ संबंधित तपासणी करण्यातसाठी ९५ जणांची स्क्रिनिंग करण्यात आली. यात ८२ जणांना संशयित म्हणून त्यांचे स्वॅब घेण्यात आले आहे. आत्तापर्यंत २ रूग्ण पॉझिटीव्ह आले होते. त्यातील एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या रूग्णाचा आज पहिल्या तपासणी अहवालात रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात आजपर्यंत २४७ रूग्ण संशयित म्हणून दाखल होते. त्यातील २२८ जणांचे मेडीकल अहवाल निगेटीव्ह, २ पॉझिटीव्ह, २ रिजेक्टटेड करण्यात आले तर १५ जणांचे मेडीकल अहवाल येण्याचे बाकी आहेत.
कोरोना अहवाला निगेटीव्ह २२८ पैकी १७० जणांना होम क्वॉरंटाईन म्हणून वैद्यकिय अधिकारी यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. आत्तापर्यंत ३ हजार ६३२ जणांचे स्क्रिनिंग करण्यात आल्याची माहिती शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. खैरे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
१२ व १३ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या कोरोना संशयित रूग्णापैकी १० व्यक्तींचे तपासणी अहवाल धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाले असून सर्वांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या अहवालामध्ये पुणे येथील रहिवासी पत्ता असलेल्या ९ दिवसाच्या बाळाचा, बऱ्हाणपूर (मध्यप्रदेश) येथील ६ महिन्याच्या बाळाचा, मलकापूर येथील ६२ वर्षीय महिलेचा तर रावेर येथील एकाच कुटूंबातील तीन व्यक्तींचा समावेश आहे. उर्वरित संशयित रूग्णांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाही. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.