मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात उद्यापासून पुढील दोन आठवडे म्हणजेच ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. याची अधिसूचना आज काढण्यात आली असून २५ मार्चला केंद्र सरकारने काढलेल्या लॉकडाऊनच्या आदेशाला मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये २५ मार्चला सुरु झालेले लॉकडाऊन आता ३० एप्रिलपर्यंत राहणार असल्याचे म्हटले आहे.
कोरोना रुग्णसंख्येनुसार महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. ग्रीन आणि आॅरेंज झोनमधील जिल्ह्यांमधील खबरदारीची उपाययोजना करून उद्योग व व्यवहार सुरू करण्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. केंद्राने काही प्रमाणात ‘लॉकडाउन’ शिथिल केले तरी मुंबई, पुणे, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात ‘लॉकडाउन’ शिथिल होणे कठीण असल्याचे संकेत आरोग्यमंत्री टोपे यांनी दिले आहेत. दरम्यान, ‘रेड झोन’मधील जिल्ह्यांत ‘लॉकडाउन’ अधिक कडक करण्याची आवश्यकताही टोपे यांनी व्यक्त केली आहे.