जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा एक रूग्ण पॉझिटीव्ह आढळला असला तरी जनतेने घाबरून जाण्याचे कारण नसून आपण सर्वांनी याचा एकत्रीतपणे प्रतिकार करायचा असल्याचे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
सध्या सुरू असणार्या कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमिवर, ना. गुलाबराव पाटील यांनी पत्रकाच्या माध्यमातून जळगाव जिल्हा वासियांना आवाहन केले आहे. यात म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या निमित्ताने आपणा सर्वांसाठी केंद्र व राज्य शासनाने केलेल्या उपाययोजनांची जिल्हा पातळीवर अंमलबजावणी करण्यात येत असतांना एक वृत्त हे सर्वांची चिंता वाढविणारे ठरले आहे. जळगावातील मेहरूणमधील एका नागरिकाला या विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले असल्याने हा विषय थोडा चिंताजनक बनला आहे. मात्र याला घाबरण्याची गरज नसल्याचे आपण सर्वांनी याचा एकत्रीतपणे प्रतिकार करणे आवश्यक आहे.
या पत्रकार पुढे म्हटले आहे की, आज कोरोनाचा एक रूग्ण सापडला असला तरी येत्या काही दिवसांमध्ये हा आकडा वाढण्याची भिती आहे. खर तर ही कोरानारूपी वादळाच्या आधीची शांतता असू शकते. मात्र, या वादळाचा आपण सर्वांनी एकत्रीतपणे प्रतिकार सामना करायचा आहे. कोरोनासाठी लावण्यात आलेल्या संचारबंदीमधील सर्वात मोठा मुद्दा म्हणजे उपासमारीचा होय. मात्र गरजूंनी घाबरण्याची गरज नाही. जिल्ह्यात कुणा गरजूची उपासमार होणार नाही याची काळजी प्रशासन घेत आहेे. भाजीपाला, किराणा आणि औषधींसारख्या अत्यावश्यक वस्तू नागरिकांना सुलभपणे पुरविण्यात येत असून यात काही अडचण निर्माण झाल्यास याचे निराकरण करण्यासाठी प्रशासनातर्फे लवकरच हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात येणार आहे. कोरोनाचे संशयित रूग्ण, निष्पन्न झालेले रूग्ण यांच्यासाठी जिल्हा रूग्णालयात आपत्कालीन कक्ष कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. तर परिस्थिती गंभीर बनल्यास रूग्णसेवेसाठी अडचण येऊ नये म्हणून मंगल कार्यालये, वसतीगृहे आधींना अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे.
संचारबंदीच्या काळात कुणी साठेबाजी वा जास्त दराने वस्तूंची विक्री करतांना आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. लोकांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतांना गर्दी करू नये असे माझे कळकळीचे आवाहन आहे. कृपा करून संचारबंदीच्या काळात रस्त्यावर अकारण फिरू नका. पोलीस प्रशासन हे शासकीय निर्णयाच्या अंमलबजावणीसह आपल्या सर्वांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी कठोर भूमिका घेत असल्याचे समजून घ्या. जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांनी या कठीण घडीच्या प्रसंगी रूग्णसेवा खंडित करू नये असे मी पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करत आहे. या अतिशय खडतर व कसोटीच्या क्षणी आपण सर्वांनी एकत्रीतपणे या आव्हानाचा सामना करायचा आहे.
ना. पाटील यांनी पुढे म्हटले आहे की, कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी घरात बसणे आणि गर्दी टाळणे हे अतिशय उपकारक ठरणारे आहे. यामुळे आपण घरातच बसा….कुटुंबासोबत वेळ घालवा….समाजासाठी आपले योगदान द्या…एक जबाबदार नागरिक म्हणून आपली सर्व कर्तव्य पार पाडा. असे झाल्यास कोरोनाचे आव्हान आपण सहजपणे परतावून लावू शकतो. तेव्हा बंधू-भगिनींनो, एकत्रीतपणे याचा आपण प्रतिकार करूया. यासाठी घरातच राहण्याचा संकल्प करूया आणि हो…थोडी जरी प्रकृती खराब झाली तरी तातडीने रूग्णालयात दाखल व्हा. मीच माझा रक्षक या भूमिकेत आपण सर्वांनी शिरायचे आहे. केंद्र व राज्य शासनासह जिल्ह्याचे प्रशासन आपल्या सोबत आहे. वैयक्तीकरित्या जिल्ह्याचा प्रथम नागरिक म्हणून मी या लढ्याच्या प्रतिकारासाठी सर्व नियमांचे पालन करत आहे. आपणही करा आणि कोरोनाला पळवा असे आवाहन त्यांनी केले आहे.