मुंबई: वृत्तसंस्था । एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर होणारा पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा पहिलावहिला उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द करण्यात आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर पक्षानं हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे.
राष्ट्रवादी . प्रवेशाच्या सोहळ्यातच उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करण्याची घोषणा खडसे यांनी केली होती. मेळावा घेऊन आमची ताकद काय आहे ते दाखवून देऊ, असं खडसे म्हणाले होते. त्यामुळं भाजपला खिंडार पाडण्यासाठी ते कोणती रणनीती आखतात, याविषयी तर्कवितर्क सुरू झाले होते. त्यातच २१ व २२ नोव्हेंबर रोजी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा शरद पवारांनी केली होती.
पवारांच्या या दौऱ्याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. पवारांच्या दौऱ्यात खडसे नेमकं कसं शक्तिप्रदर्शन करतात आणि भाजपचे किती मोहरे गळाला लावतात, याबद्दल उत्सुकता होती. मात्र, पवारांनी हा दौरा अचानक रद्द केला आहे.
खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. खडसे स्वत: होम क्वारंटाइन आहेत. अशा परिस्थितीत उत्तर महाराष्ट्राचा दौरा केला व त्या दौऱ्यात खडसेंनी उपस्थिती लावली तर चुकीचा संदेश जाईल, असा एक मतप्रवाह पक्षात होता. त्यातूनच पवारांनी हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं. दौरा रद्द करण्याचं कुठलंही कारण पक्षातर्फे देण्यात आलेलं नाही.