भडगाव प्रतिनिधी । तालुक्यात कोरोना व्हायरसच्या अफवेमुळे चिकनचा खप खूपच कमी झाल्यामुळे पोल्ट्री व्यावसाय धोक्यात आल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी तहसीलदार, आमदार, पशु वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. मात्र या कोरोनामुळे राज्यातील पोल्ट्री व्यावसाय मोठ्या संकटात सापडला आहे. व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणाऱ्या अफवा यासाठी कारणीभूत ठरत आहे. चिकन खाल्याने कोरोनाची लागण होते, असे चुकीचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. याचा परिणाम असा झाला की चिकनचे दर इतिहासात कधीच नव्हे एवढे कमी म्हणजे दहा ते पंधरा रुपये किलो झाले आहेत.
कोरोनाच्या अफवांमुळे पोल्ट्री फार्मचा बाजार उठला आहे. राज्यात असंख्य शेतकरी आहेत, ज्यांनी शेतीला पर्याय म्हणून कुक्कुटपालन सुरु केलं, त्या शेतकऱ्यांचं अक्षरश: कंबरडं मोडलं आहे. बँकाकडून लाखोंचं कर्ज घेतलं, शेड उभारले, पिलांची जपणूक केली. परंतु कोरोना व्हायरस आला काय अन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला.
एक किलो बॉयलर कोंबडी तयार करण्यासाठी ७५ रुपये खर्च येतो आणि आज रोजी भाव पंधरा रुपये प्रति किलो आहे. अडीच किलो वजनाच्या कोंबड्या तयार करण्यासाठी १८८ रुपये खर्च येतो. आज अडीच किलो कोंबडी विकून ३८ रुपये होतात म्हणजे शेतकऱ्याला १५० रुपये प्रतिपक्षी तोटा होत आहे त्यामुळे ५ हजार पक्षी धारक शेतकर्यांचे सात ते साडेसात लाख रुपयांचे नुकसान होत आहे.
कॉकरेल व बॉयरेल पक्ष्यांमध्ये १ किलो कोंबडी तय्यार करण्यासाठी ११० रुपये खर्च येतो आज रोजी भाव ५० ते ५५ रुपये किलो असून निम्म्या किमतीत विकल्या जात आहेत. ५००० पक्ष्यांच्या फार्मचा हिशोब केल्यास २ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान होत आहे. पौल्ट्री व्यावसायिक गेल्या 2-3 महिन्यापासून नुकसान सहन करीत असून हे अजून किती दिवस चालते हे सांगता येत नाही. तरी शासनाने याची योग्य ती दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच या व्यवसायावर अवलंबून असलेले मका व सोयाबीन चे शेतकरी सुद्धा अडचणीत सापडले आहेत. या निवेदनावर श्याम शिंपी सर, हेमंत महाजन, अशोक जाधव, मंगेश पाटील, ईश्वर पाटील अश्या तालुक्यातील ३७पौल्ट्री धारकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.