जळगाव, प्रतिनिधी |कोरोनामुळे पती गमावलेलया एकल महिलांसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स व तालुका स्तरावर वात्सल्य समिती स्थापन करण्यात आलेली आहे. मात्र, यांची कार्यवाही जिल्ह्यात संथगतीने होत असून या महिलांच्या विविध समस्या सोडवण्यात याव्यात अशी मागणी लोकसंघर्ष मोर्चातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनाचा आशय असा की, महाराष्ट्रात कोरोनामुळे पती गमावल्याने एकट्या झालेल्या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स व तालुका स्तरावर वात्सल्य समितीची स्थापना झाली. जळगाव जिल्ह्यातही याची अमलबजावणी सुरू असून ह्याबाबत लोक संघर्ष मोर्चा व कोरोनामुळे एकल झालेल्या महीलांसोबत जिल्ह्यातील ११ तालुक्यात वात्सल्य समिती बरोबर मीटिंग झालेल्या आहेत. त्यावेळी मीटिंगमध्ये अनेक कायद्यात तरतूद असलेल्या योजनांच्या अमलबजावणीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात कार्यवाही खूप संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच या सर्व महिलांनी लोकसंघर्ष मोर्चाच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून या महिलांचे प्रश्न सोडवण्याबाबत निवेदन दिले. यावेळी सुप्रिम कोर्टात केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासना प्रमाणे ५० हजार रुपये बाबत ऑनलाईन अर्ज भरून सुध्दा अनेक महिलांचे नाव यादीत आलेले नाही. काही महिलांचे पेंडींग दाखवले जात आहेत तर काही महिलांचे नाकारण्यात आले आहेत. ज्या महिलांकडे कोरोनामुळे पती गमावल्याचे सर्टिफिकेट आहे त्यांना त्रुटी दूर करून ५० हजाराचा लाभ देण्यात यावा. जिल्ह्यातील अशा माता-पित्यांच्या १८ वर्षाखालील पाल्यांसाठी अद्याप बाल संगोपन योजना सुरू झालेली नाही. लातूर मधे मात्र अशा पाल्यांना निधी मिळाला आहे. ह्याबाबत कृपया पाल्यांची यादी जाहीर करून तात्काळ निधी वाटप करण्यात यावा. संजय गांधी निराधार योजनेमधे फॉर्म भरूनदेखील अद्याप या महिलांना पेन्शन योजनेचा लाभ मिळाला नाही ह्या बाबत तात्काळ कार्यवाहीचे आदेश द्यावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या सर्व समस्यांबाबत वात्सल्य समितीचे अध्यक्ष, लोक संघर्ष मोर्चाचे प्रतिनिधी व जिल्हा टास्क फोर्सचे सर्व सदस्य यांची एकत्रित मिटिंग घेऊन सदर प्रश्न सोडवण्यात यावे व सदर महिलांना न्याय द्यावा अशीदेखील विनंती जिल्हाधिकारी यांना करण्यात आली. आहे. याप्रसंगी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, उषा पुजारी,नलिनी देव , रोहिणी पाटील, राधा पाटील, शारदा पाटील, शिला सुरवाडे ,सुनीता महिराडे, अनिता शिरसाठ,आशा खैरनार,वैशाली कोंढाळकर व सुप्रिया चव्हाण आदी उपस्थित होते.