कोरोनामुक्त रुग्णांची चीनविरुद्ध एकवटली वज्रमुठ ; चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची महापौरांनी दिली शपथ

जळगाव (प्रतिनिधी) कोरोना हा चीनची देन असून आम्ही आजपासून चिनी मालाचा बहिष्कार करू अशी शपथ घेत मनपाच्या कोविड केअर सेंटरमधून कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांनी चीनचा निषेध केला. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी यावेळी सर्व उपस्थितांना चीन विरोधी शपथ दिली. सर्वांनी एकाच वेळी वंदे मातरमच्या घोषणा दिल्याने वातावरण देशभक्तीमय झाले होते.

 

जळगाव मनपाच्या कोविड केअर सेंटरमधून मंगळवारी ८५ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. चीनच्या वुहानमधून आलेल्या कोरोनामुळे जगाचे आणि भारताचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोना चीनने दिलेला आजार असल्याचा समज सर्व कोरोना रुग्णांचा झाला आहे.

 

महापौरांनी दिली शपथ

चीन नेहमीच भारताविरुद्ध कुरपत्या करीत असतो. कोरोना देखील चीनमधून आला असून आपण सर्वांनी आजपासून चिनविरुद्ध मोहीम हाती घेत स्वदेशीचा नारा द्यायला हवा. चिनी मालाचा बहिष्कार करून चीनचा निषेध करूया अशी शपथ महापौर सौ.भारती सोनवणे यांनी कोरोनामुक्त झालेले रुग्ण आणि उपस्थितांना दिली. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, डॉ.संजय पाटील, डॉ.विजय घोलप, अतुल बारी आदींसह सर्व परिचारिका, वार्डबॉय आणि कर्मचारी उपस्थित होते.

 

‘बॉयकॉट चायना’ मास्कने वेधले लक्ष

कोरोना मुक्त झालेल्या सर्व रुग्णांना महापौर सौ.भारती सोनवणे यांनी बॉयकॉट चायना व वंदे मातरमचा संदेश देणारे मास्क वाटप केले होते. देशभक्ती जागविणाऱ्या आणि चीनचा निषेध करणारे मास्क इतरांना प्रेरणा देत सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

 

टाळ्या वाजवून दिला निरोप

कोरोनामुक्त झालेल्या सर्व ८५ रुग्णांशी महापौरांनी संवाद साधला. कोरोना योद्धा म्हणून इतरांना सतत प्रेरणा देण्याचे आवाहन महापौरांनी केले. कोरोना मुक्त झालेल्यांना टाळ्या वाजवून निरोप देण्यात आला.

 

चिनी मालाचा निषेध करावा : महापौर

कोरोना हा चीनने दिला आहे. संपूर्ण जगाला संशय आहे की चीननेच कोरोना पसरवला आहे. चिनी नेहमीच भारताविरुद्ध कुरपत्या करत असतो. आजपासून आपण सर्वांनी आणि व्यापाऱ्यांनी शक्य तोवर चिनी वस्तू घेऊ नये. चिनी मालाचा बहिष्कार करून स्वदेशी मालाला प्राधान्य द्यावे. आपणच आपल्या देशाला बळकट करून चीनचा निषेध करावा, असे आवाहन महापौर सौ.भारती सोनवणे यांनी केले.

 

कोरोना आजार घाबरण्यासारखा नाही. मी आणि माझे कुटुंब पूर्णतः बरे झाले आहे. मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये सर्व सुविधा आहे. महापौरांनी आज आम्हाला शपथ दिली असून चिनी वस्तू आम्ही खरेदी करणार नाही. आपण देखील शक्यतो चिनी वस्तूंची खरेदी टाळावी आणि स्वदेशीचा अवलंब करावा.

– दिक्षा माळी, रामेश्वर कॉलनी, जळगाव

माझ्या परिवारात १४ लोक कोरोना पॉझिटिव्ह होते. माझ्या गर्भवती पत्नीसह ८३ वर्षीय आजोबांपर्यंत आम्ही सर्वांनी कोरोनाशी लढा दिला असून पूर्णतः बरे झाले आहोत. महापौर आणि मनपा प्रशासनाने आम्हाला वेळोवेळी योग्य ती मदत केली. कोविड सेंटरमध्ये कोणतीही गैरसोय होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्यात येते, काही असुविधा असल्यास ती सोडविली जाते. ज्या चीनमुळे हा आजार आपल्याला मिळाला आहे, ज्याच्यामुळे आपल्यावर आज ही वेळ आली आहे. लक्षात ठेवा आज इथून बाहेर पडल्यावर चिनी मालावर जास्तीत जास्त बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न करा. चीनविरुद्ध लढा देणे एका दिवसाचे काम नसू ते टप्प्याटप्प्याने शक्य करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा जो संदेश दिला आहे त्यावर लक्ष केंद्रित करून स्वदेशी वस्तूंचा पर्याय वापरात आणा.

– तुषार भामरे, शनीपेठ, जळगाव

कोरोना हा नवीन आजार नसून एक जुनेच संक्रमण आहे. कोरोनाची भिती न बाळगता खबरदारी बाळगावी. कोरोना हा चीनमधून आलेला असल्याने रुग्णांना चीनविषयी चीड निर्माण झाली आहे. आज महापौरांनी आपल्या सर्वांना चीनचा निषेध करण्याची शपथ दिली असून सर्वांनी चिनी अँप्स आणि चिनी मालाचा बहिष्कार करून स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य द्यायला हवे.

– डॉ.संजय पाटील, वैद्यकीय अधिकारी, मनपा.

Protected Content