जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर घाबरून न जाता आपण त्यावर कशाप्रकारे मात केली ते इतरांना सांगावे. कोरोनाबद्दल भिती न पसरवता इतरांना जागरूक करावे, असे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले.
जळगाव शहरातील १७ तर तालुक्यातील ५ अशा २२ रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने बुधवार ३ जुन रोजी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कोविड सेंटरमधून सुट्टी देण्यात आली. यावेळी महापौर भारती सोनवणे, खा.उन्मेष पाटील यांनी कोरोनामुक्त झालेल्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, खा.उन्मेष पाटील, आ.स्मिता वाघ, आ.सुरेश भोळे, स्थायी समिती सभापती ॲड.शुचिता हाडा, नगरसेवक कैलास सोनवणे, डॉ.राम रावलानी, डॉ.शिरीष ठुसे आदी उपस्थित होते.
७ महिन्याचे बाळ ते ७० वर्षाच्या वृद्धेला मिळाला डिस्चार्ज
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये बुधवारी ७६ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी २२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये ७ महिन्याच्या बाळासह ७० वर्षाच्या वृद्धेचा समावेश होता.
प्रत्येकाने स्वतःच्या व्हिडीओतून इतरांना प्रेरित करावे : खा.पाटील
जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित जे रुग्ण योग्य उपचार घेऊन बरे झाले आहेत त्यांनी इतरांना प्रेरित करण्यासाठी स्वतःचा एक मिनिटांचा व्हिडीओ तयार करावा. कोरोनावर कशाप्रकारे मात केली, कोरोनापासून लांब राहण्यासाठी काय खबरदारी घ्यावी ते इतरांना व्हिडीओच्या माध्यमातून सांगावे, असे आवाहन खा.उन्मेष पाटील यांनी कोरोनामुक्त झालेल्यांना केले.
रुग्णांनी महापौरांचे मानले आभार
कोरोना बाधित असलेल्या रुग्णांशी दररोज संपर्क करून महापौर सौ.भारती सोनवणे या माहिती जाणून घेत होत्या. रुग्णांना काही असुविधा असल्यास त्या दूर करण्याचा प्रयत्न महापौरांनी केला. कुटुंबाप्रमाणे काळजी घेतल्याने सर्व रुग्णांनी महापौरांचे आभार मानले. कोरोनामुक्त झालेल्यांना टाळ्या वाजवून घरी पाठविण्यात आले. तसेच पुढील काही दिवस खबरदारी घेण्याचे आणि घरातच राहण्याचे आवाहन देखील महापौरांनी केले.