मुंबई (वृत्तसंस्था) 14 एप्रिलपासून टप्प्या टप्प्याने लॉकडाऊन उठवण्यात येणार असला तरी कोरोना विषाणू रोखण्यासाठी जारी केलेले निर्बंध जूनपर्यंतदेखील कायम राहतील, असे स्पष्ट संकेत मिळायला लागले आहेत.
जगभरातील कोरोना स्थिती लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जारी केला. या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, फळे- भाज्या मार्केट १४ तास खुले ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. इतर राज्यांमध्येसुद्धा असेच निर्बंध शिथील आहेत. परंतू या सवलतीचा अनेक जण गैरफायदा घेत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे ठरलेल्या काळात कोरोनाविरुद्ध जिंकणे शक्य होणार नाही, हे केंद्र व राज्य सरकारांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच अत्यावश्यक सेवांची ओळखपत्रे थेट ३० जूनपर्यंतची देण्यात आल्याचे समजते. दिल्ली सरकारने आपल्या अधिपत्याखालील लोकमान्य रुग्णालयातील कर्मचार्यांना अत्यावश्यक सेवा म्हणून ३० जून तर नवी मुंबई महानगरपालिकेनेही आपल्या सफाई कर्मचार्यांना २५ जून पर्यंतची ओळखपत्र दिली आहेत. दुसरीकडे एप्रिल आणि मेमध्ये कोरोनाचे रुग्ण आणखी वाढू शकतात, असे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच अलीकडे दिल्यामुळे हे सारे निर्बंध जूनपर्यंत कायम राहतील असेच स्पष्ट संकेत मिळत आहे.