भडगाव प्रतिनिधी । भडगावात कोरोनाची साथ पसरवण्यासाठी एका वृध्दाची अंत्ययात्रा कारणीभूत ठरल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणी हलगर्जीपणा करून नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी पाचोरा येथील डॉक्टर आणि भडगावच्या एका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरातील दत्तमठी गल्लीतील एका वयोवृद्धावर पाचोरा येथील डॉ. मंगलसिग परदेशी यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान कोरोना संशयित म्हणून प्रशासनाने त्यांचे स्वॅब घेतले होते. त्यांचा अहवाल येण्यापूर्वीच त्या वृद्धाचा ११ मे रोजी मृत्यू झाला. यावेळी डॉ.मंगलसिंग परदेशी यांनी केंद्र शासनाने निर्देशित केलेल्या सूचनेप्रमाणे कोरोना संशयित म्हणून त्या वृद्धाचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देणे अपेक्षित होते. मात्र, अशी काळजी न घेता त्यांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
दरम्यान, या वृद्धाच्या अंत्यविधीसाठी मोठी गर्दी उसळली होती. यातूनच शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे संचारबंदीचा आदेश व फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन आणि कोविड-१९ पसरवण्यास कारणीभूत ठरल्याने भडगाव तहसीलदार माधुरी आंधळे यांच्या फिर्यादीवरून सुरेश अमरसिंग परदेशी (रा. दत्तमठी गल्ली, रा.भडगाव) व पाचोरा येथील डॉ. मंगलसिंग परदेशी यांच्या विरुद्ध भादंवि कलम १८८, २६९, २७० व साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ चे २, ३, ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणी कारवाई होत नसल्याने चर्चेला उधाण आले होते. शेवटी प्रशासनाने या प्रकरणी कारवाई केल्याचे स्पष्ट झाले आहे.