वॉशिंग्टन वृत्तसंस्था । करोनाचे थैमान अमेरिकेत सुरू असून जागतिक महासत्तेने या संसर्गासमोर हात टेकले असल्याचे चित्र आहे. रविवारीही अमेरिकेत मृतांच्या संख्येत वाढ झाली असून करोनाने आतापर्यंत ४० हजार बळी घेतले आहेत. तर ७ लाख ५० हजारांहून जास्त जणांना करोनाची बाधा झाली आहे. कोरोनामुळे मृतांच्या आकडेवारीत भयानक वाढ होत असल्याने अमेरीका चिंतेत पडली आहे.
अमेरिकेत सातत्याने करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. अमेरिकेत ७ लाख ५० हजारांहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली आहे. न्यूयॉर्क राज्याला करोनाचा मोठा फटका बसला आहे. न्यूयॉर्कमध्ये करोनाबाधितांची संख्या सुमारे २ लाख ५० हजाराच्या घरात पोहचली आहे. तर, १८ हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्क राज्यानंतर न्यूजर्सीमध्ये सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. न्यूजर्सीमध्ये ८५ हजाराहून अधिकजणांना संसर्ग झाला असून ४ हजारजणांचा मृ्त्यू झाला आहे. अमेरिकेतील सर्वच ५० राज्यांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला आहे. एकीकडे मृत्यूचे तांडव सुरू असताना अमेरिकेत ७० हजार बाधितांनी करोनाला मात दिली आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना संसर्गाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा टीका केली आहे. चीनच करोनाच्या संसर्गासाठी जबाबदार असल्याचे समोर आल्यास त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील अशी धमकी ही ट्रम्प यांनी दिली आहे. चीनने करोनाच्या संसर्गाबाबत अमेरिकेला अंधारात ठेवले असून सुरुवातीला कोणतेही सहकार्य केले नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.