मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे राज्यात प्रचंड घडामोडी गतीमान झाल्या असतांना कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते महाविकास आघाडीबाबत तोंडातून एकही शब्द का काढत नाहीत ? असा प्रश्न शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर प्रारंभीचे काही दिवस वगळता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी याबाबत काहीही भाष्य केलेले नाही. संजय राऊत यांच्या अटकेनंतर मोजके नेते वगळता कुणीही त्यांना पाठींबा दिला नाही. यातच निवडणुकीची धामधुम सुरू असतांनाही कुणी महाविकास आघाडीबाबत बोलत नसल्याची बाब राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर येथील कार्यक्रमात बोलतांना याच बाबींकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
फक्त शिवसेनेची मंडळी महाविकासआघाडी म्हणून बोलत आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाले महाविकासआघाडीबाबत शब्ददेखील बोलत नाहीत असे जाधव म्हणाले. तसेच, जयंत पाटील स्वबळाची भाषा करत असताना आपण स्वतंत्र का लढू शकत नाही? असा सवाल भास्कर जाधवांनी विचारला. तर आगामी काळात स्वबळावर लढणेच योग्य राहील असे देखील ते म्हणालेत.