चंदिगढ (वृत्तसंस्था) केंद्र सरकार दिवाळीखोरीत निघाले आहे, यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे कोरोना व्हायरसमुळे आरोग्यासंदर्भात उद्भभवलेल्या अभूतपूर्व अशा संकटाला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार राष्ट्रीय गंगाजळीतून निधी घेऊ शकते. कारण राज्यांना निधीची गरज आहे, असे मत मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी व्यक्त केले आहे.
‘इंडियन एक्स्प्रेस’शी संवाद साधताना अमरिंदर सिंह पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने लॉकडाउनला मुदतवाढ दिली. यानंतर निर्माण होणारी आर्थिक आव्हानावर मात करण्यासाठी उपाय, व्यापार आणि व्यवसाय, त्याचबरोबर स्थलांतरितांचा प्रश्न याविषयी केंद्राकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. तसेच केंद्राकडून राज्यांशी चर्चा देखील करण्यात आलेली नाही. स्थलांतरित कामगारांच्या राहण्याची आणि आरोग्याची काळजी घेऊन काही उद्योग आणि उत्पादक कंपन्या सुरू करण्याची परवानगी आम्ही केंद्राकडे मागितली होती. त्यानंतर केंद्राकडून नियमावली जारी करण्यात आली. मात्र, उद्योग आणि व्यापार सुरू करण्याविषयी कोणतीही माहिती केंद्राकडून जारी करण्यात आलेल्या अॅडव्हायजरीमध्ये नाही, असेही मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी सांगितले. तसेच सर्व राज्य आपत्तीच्या टोकावर आहेत. राज्यांकडे उत्पन्नाचा कोणताही मार्ग नाही. केंद्र सरकारने आता राज्यांना मदत करण्यासाठी मार्ग काढले पाहिजे, अशी आशा देखील अमरिंदर सिंह यांनी व्यक्त केली आहे.