नवी दिल्ली : वृत्तसंस्था । आता केंद्र सरकाने रेमडेसीवरची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सध्या थैमान घातलं आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन बाधित आढळून येत आहेत, शिवाय रूग्णांच्या मृत्यू संख्येतही वाढ सुरूच आहे. देशभरात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत लसींच्या तुटवड्यामुळे काही ठिकाणी अडथळा देखील निर्माण होताना दिसत आहे. अनेक रूग्णांना आवश्यक असलेलं रेमडेसीवर इंजेक्शन उपलब्ध होत नसून, रूग्णांच्या नातेवाईकांना या इंजेक्शनसाठी भटकंती करावी लागत आहे.या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचंही बोललं जात होतं.
रेमडेसीवर इंजेक्शन मिळत नसल्याने नागरिकांमधून राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात होता. एकीकडे महाराष्ट्रात अशी परिस्थिती असताना, दुसरीकडे गुजरातमध्ये मात्र या इंजेक्शनचं मोफत वाटप सुरू असल्याचं समोर आलं आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपावर टीका देखील केली आहे.
देशात दुसरी लाट थैमान घालत असताना केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला हा निर्णय निश्चितच महत्वाचा आहे. कारण अनेक ठिकाणच्या खासगी रूग्णालयांमधील या इंजेक्शनचा साठा पूर्णपणे संपलेला होता. केवळ सरकारी रूग्णालयातच रेमडेसीवर उपलब्ध होतं. त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती.
दरम्यान, पुण्यात एक नर्स व तिच्या सहायकास रेमडेसीवर इंजेक्शनची अवैधरित्या विक्री करताना आज अटक करण्यात आल्याचेही समोर आले आहे.