केंद्रीयमंत्री सुभाष सरकार यांचे रवींद्रनाथ टागोरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

 

कोलकाता : वृत्तसंस्था । रविंद्रनाथ टागोर यांचा वर्ण सावळा असल्याने त्यांची आई लहानपणी त्यांना जवळ घेत नव्हती, असं वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री सुभाष सरकार यांनी केलं आहे.

 

केंद्रीय मंत्री सुभाष सरकार यांच्या वादग्रस्त विधानामुळे पुन्हा एकदा राजकारणाला ऊत आला आहे. मंत्री सुभाष सरकार यांनी नोबेल पुरस्कार विजेते रविंद्रनाथ टागोर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून नव्या वादाला फोडणी मिळाली आहे.

 

या विधानानंतर पश्चिम बंगालमध्ये सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसनं भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. रविंद्रनाथ टागोर यांचा अपमान असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. दुसरीकडे, वर्णभेदाविरुद्ध वक्तव्य असल्याचं सांगत केंद्रीय मंत्री सुभाष सरकार यांनी सारवासारव केली आहे.

 

केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार पश्चिम बंगालच्या विश्वभारती विद्यापीठात गेले होते.   यावेळी मंत्री सुभाष सरकार यांनी वादग्रस्त विधान केलं. “टागोर यांच्या कुटुंबीयात सर्व गोऱ्या वर्णाचे होते. मात्र टागोर यांचा रंग सावळा होता. गोरा रंग दोन प्रकारचा असतो. एक हल्का पिवळ्या रंगास आणि दुसरा लालसर गोरा रंग असतो. टागोर यांचा रंग लालसर गोरा होता. इतर सदस्यांच्या तुलनेत ते सावळे दिसायचे. त्यामुळे त्यांची आई आणि कुटुंबातील अन्य सदस्य त्यांना जवळ घेत नव्हते.’, असं विधान त्यांनी यावेळी केली. यापूर्वीही त्यांनी रविंद्रनाथ टागोर यांच्या जन्मास्थळाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. रविंद्रनाथ टागोर यांचा जन्म बीरभूमध्ये झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

 

“सुभाष सरकार यांनी केलेलं वक्तव्य वर्णभेदी आहे. सरकार यांना इतिहास माहिती नाही. जगाला माहिती आहे रविंद्रनाथ टागोर यांचा रंग गोरा होता. अशा पद्धतीने वक्तव्य करून भाजपाने बंगालचा अपमान केला आहे. सुभाष सरकार यांना विश्व भारतीत पुन्हा बोलवू नये”, अशी टीका तृणमूल काँग्रेस नेते अभिषेक बॅनर्जी यांनी केली आहे.

 

Protected Content