नोव्हा स्कॉटिया वृत्तसंस्था । कॅनडाच्या नोव्हा स्कॉटिया प्रांतामध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. एका बंदुकधाऱ्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात एका पोलीस अधिकाऱ्यासह १६ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे अंदाधुंद गोळीबाराचा हिंसाचार तब्बत १२ तास चालला होता. पोलिसांनी या हल्लेखोराला संपवल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
ग्रॅबियल वॉर्टमॅन असे या हल्लेखोराचे नाव आहे. कॅनडाच्या इतिहासातील आतापर्यंतचे हे सर्वात भीषण हत्याकांड आहे. या गोळीबारामागे हल्लेखोराचा उद्देश स्पष्ट झालेला नाही. वॉर्टमॅन रॉयल कॅनडीयन माऊंटन पोलिसांच्या गणवेशामध्ये होता. त्यामुळे मनात आले म्हणून त्याने हे कृत्य केले, यावर पोलीस विश्वास ठेवायला तयार नाहीत. वॉर्टमॅनने सर्वप्रथम रात्री ११.३०च्या सुमारास गोळीबार केला. त्यानंतर तब्बल १२ तासांनी स्थानिक पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत त्याचा खात्मा झाला.