धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे जळगाव दौऱ्यावर असतांना धरणगाव तालुक्यात नुकसानग्रस्त पिक पाहणी केली. यावेळी ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्यासह सहकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करून कृषी मंत्र्याच्या दौऱ्यात गोंधळ व आदेशाचे भंग केल्याप्रकरणी जमावावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहीती अशी की, राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे बुधवारी २२ मार्च रोजी जळगाव जिल्ह्यात दौऱ्यावर होते. त्यांनी चोपडा, धरणगाव आणि एरंडोल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. दरम्यान, धरणगाव तालुक्यात दौरा करत असतांना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वात कापूस फोटो आंदोलन करून प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केले. त्यांच्या सोबत ठाकरे गटाचे युवासेना जिल्हाध्यक्ष निलेश चौधरी, भागवत चौधरी, ॲड.शरद माळी, राजेंद्र ठाकरे, विजय पाटील, विलास वाघ, महेंद्र चौधरी, भरत महाजन, गणेश मराठे, राहूल महाजन, बापू महाजन यांच्यासह इतर जणांनी दौऱ्यात गोंधळ निर्माण करत आदेशाचा भंग केला. याप्रकरणी पोलीस कर्मचारी मिलींद सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुलाबराव वाघ, निलेश चौधर यांच्यासह ठाकरे गटाचे पदाधिकारी यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील हे करीत आहे.