नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चीनविरोधात लढण्यासाठी पंतप्रधानांजवळ कुठलीही रुपरेषा नाही, त्यामुळेच चीन आपल्या हद्दीत घुसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पूर्ण फोकस आपली इमेज बनवण्यावर आहे. सर्व संस्था त्याच कामात गुंतल्या आहेत. केवळ कुण्या एका व्यक्तिची प्रतिमा बनवने म्हणजे राष्ट्राची प्रतिमा होऊ शकत नाही, अशी टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी सध्या ‘सत्य का सफर: राहुल गांधी के साथ’ या व्हिडीओ सीरीजच्या माध्यमातून देशसमोरील प्रश्नांना वाचा फोडत आहेत. या सीरीजमधील तिसऱ्या व्हिडीओच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:ची प्रतिमा बनवण्यावर १०० टक्के लक्ष केंद्रीत केले आहे. भारतातल्या ताब्यात घेतलेल्या संस्था तेच काम करण्यामध्ये व्यस्त आहेत. एका माणसाची प्रतिमा राष्ट्रीय दृष्टीकोनाला पर्याय असू शकत नाही, असे राहुल गांधी यांनी टि्वट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. तुम्ही बळकट स्थितीमध्ये राहून चीनशी चर्चा करत असाल, तरच तुम्ही त्यांच्याशी चर्चा करु शकता. चीनने जर तुमचा कमकुवतपणा पकडला, तर अडचण आहे. चीनचा विषय हाताळण्यासाठी तुमच्याकडे दृष्टीकोन असला पाहिजे. भारताला जागतिक दृष्टीकोनाची गरज आहे. तसेच मी केवळ राष्ट्रीय दृष्टिकोनाबद्दल बोलत नाही तर आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून बोलत आहे. बेल्ट अँड रोड हा पृथ्वीचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न आहे. भारताने जागतिक दृष्टीकोन स्वीकारला पाहिजे. भारताला आता एक विचार बनावा लागेल, एक जागतिक विचार असावा, असे राहुल गांधी म्हणाले.