कोल्हापूर : वृत्तसंस्था । मी कुणाचा गुलाम म्हणून फिरत नाही. राष्ट्रीय समाज पक्षाचं अंतिम ध्येय दिल्ली आहे. त्यामुळे कोणाचाही आधार घेईन, पण एक दिवस पंतप्रधान जरुर होईन असा दावा रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला. ते कोल्हापुरात बोलत होते.

काँग्रेस- राष्ट्रवादीचा रस्ता डांबरीकरणाचा आहे, तर भाजपचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा आहे. मी मात्र पाणंदीने पुढे चाललो आहे. माझाही सूर्य कधी तरी उगवेल अशी देखील आशा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी चार तारखेला राष्ट्रीय समाज पक्ष राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार असल्याची माहिती जानकर यांनी दिली. सोलापुरात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावर विचारला असता ते माझ्या पक्षात नाहीत, त्यांच्यावर बोलून त्यांना का मोठं करू असं म्हणत त्यांनी यावर बोलणं टाळलं.
पंतप्रधानपदाबाबत जानकर म्हणाले, “आमच्या पक्षाचं ध्येय हे दिल्ली आहे. टार्गेट दिल्ली ठेवून आमच्या पक्षाची वाटचाल सुरु आहे. मी एक ना एक दिवस पंतप्रधान जरुर होईन. त्यासाठी मला कुणाचीही मदत घ्यावी लागली, कुणाचाही आधार घ्यावा लागला तर ती घेईन. पण मी पंतप्रधान होणारच”
राज्यात 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं त्यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे कॅबिनेट मंत्री झाले होते. भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी डोक्यावर ठेवलेला हात, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंविरोधात बारामतीतून दिलेली लढत आणि फडणवीस यांच्या सरकारात मिळालेलं मंत्रिद यामुळे चर्चेत आले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात दखलपात्रंही झाले.
जानकर यांनी लोकसभा निवडणुकीत मातब्बर लोकांनाच आव्हान दिलं. त्यांनी नांदेड (1998), सांगली (2006), माढा(2009), बारामती (2014) अशा चार लोकसभाही जानकरांनी लढवल्या. प्रत्येक निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पण जानकर पराभूत होऊनही चर्चेत राहिले.