नागपूर (वृत्तसंस्था) प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार नागपूर महानगरपालिकेच्या पथकाने कुख्यात गुंड संतोष आंबेकरचा अनधिकृत बंगला जमीनदोस्त केला आहे. मुंढे यांच्या धडक कारवाईची नागपूरमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.
तुकाराम मुंढे यांनी नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासूनच शहरातील अनधिकृत बांधकामाकडे लक्ष केंद्रित केले आहे. कुख्यात गुंड संतोष आंबेकरचा नागपूरमधील इतवारी भागात अनाधिकृत बंगला होता. नागपूर महानगरपालिकेने आंबेकरला कायदेशीर नोटीसही बजावली. मात्र, त्याने स्वतःहून अतिक्रमण हटवले नाही. यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संबंधित बंगला जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे मनपाच्या पथकाने आज धडक कारवाई करत हा बंगला पाडला.