जळगाव प्रतिनिधी । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आयकर भरणारे व्यक्ती अपात्र असल्याने अशा आयकर भरणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांकडून त्यांना मिळालेली लाभाची रक्कम परत वसुल करणेबाबत वसुलीच्या नोटीस देण्यात आलेल्या आहेत. दिवाळी सुट्टीतही लाभाची रक्कम परत करता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आयकर भरणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांपैकी काही लाभार्थी बाहेरगांवी राहणारे असल्याने त्यांना लाभ परत करण्यास अडचणी येत आहेत. बाहेरगांवी राहणारे लाभार्थी दिवाळी निमित्त स्वगावी आल्यावर त्यांना संबंधित तहसिल कार्यालयात लाभाची रक्कम परत करणेकामी चेक जमा करता येईल. तसेच लाभार्थ्यांकडे चेक उपलब्ध नसल्यास धनाकर्ष, चलनाने रक्कम जमा करता येईल. यासाठी महसुल प्रशासन व कृषी विभाग यांच्या ग्रामपातळीवरील सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना यासंदर्भात आदेशित केलेले आहे. त्यांना दिवाळी सुटी काळात देखील बाहेरगांवी राहणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांना लाभाची रक्कम परत करणेकामी सहाय्य करण्याच्या सुचना देण्यात आलेला आहेत.
या योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, लाभाची रक्कम तलाठी, कृषी सहाय्यक किंवा कोतवाल यांचेमार्फत परत करुन सहकार्य करावे. तसेच ग्राम पातळीवरील तलाठी, कृषी सहाय्यक, कोतवाल यांनी आपल्या गावात बाहेरगावावरुन आलेल्या या योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.