मुंबई प्रतिनिधी | स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो यात भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांना यातून काढून टाकल्यानंतर त्यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेत सातार्याचे अभिनेते किरण माने यांनी साकारलेलं विलास पाटील हे पात्र लोकप्रिय झाले. अभिनेता किरण हे त्यांच्या फेसबूक पेजवरुन अनेक विषयांवर बेधडकपणे भाष्य करत असतात. त्यातच त्यांची एक राजकीय पोस्ट चांगलीच व्हायरल झाली. त्यामुळे माने यांना संबंधित मालिकेतून वगळण्यात आले. यामुळे प्रचंड खळबळ उडाली. या मालिकेच्या निर्मात्यांनी सोशल मीडियातील पोस्ट नव्हे तर प्रोफेशनल कारणांमुळे त्यांना या मालिकेतून काढल्याचा दावा केला असला तरी माने यांना मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळू लागला आहे.
किरण माने यांनी आपली हकालपट्टी झाल्यानंतर यावर प्रखर भाष्य व्यक्त केले आहे. शिवबा-तुकोबांच्या आणि शाहू-फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे घडलं आहे, हे लक्षात ठेवा. या महाराष्ट्रात अशी झुंडशाही खरं तर खपवून घेतली जाऊ नये. यात जर मला न्याय मिळाला नाही तर आता झुंडशाहीविरोधात बोलायला कुणीच धजावणार नाही, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. मला न्याय मिळाला तर खूप लोक याविरोधात बोलायला पुढे येतील, काय करायचंय हे लोकांनी ठरवावं. माझ्या सगळ्या पोस्ट्स वाचा, त्यामध्ये कुठेही जातीवादी विखार दिसणार नसल्याचे किरण माने यांनी म्हटले आहे. यानंतर किरण याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीतील तपशील समोर आला नसला तरी याकडे मनोरंजन विश्वाची नजर असल्याचे दिसून आले आहे.