जळगाव (प्रतिनिधी) कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याच्या उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे व्यवहार काही अटींवर सुरु ठेवण्यास जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी परवानगी दिली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, ज्या ठिकाणी भाजीपाला बाजाराचे लिलाव/व्यवहार भरविण्यात येतात. अशा सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये केवळ भाजीपाला विक्री करणारे शेतकरी व खरेदी करणारे घाऊक व्यापारी यांनाच प्रवेश असेल. याठिकाणी कोणत्याही प्रकारे, कोणत्याही रिटेलर्स (किरकोळ व्यापारी) यांना प्रवेश असणार नाही.
जळगाव जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकरी, व्यापारी यांची गर्दी होणार नाही याबाबत स्थानिक पोलीसांनी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त पुरविण्याची व्यवस्था करावी. लिलाव/व्यवहार सुरु असतांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तेथे हात धुण्याची पुरेशी व्यवस्था करण्याकरीता संबंधीत बाजार समितीला महानगरपालिका/नगरपालिका/नगरपंचायत यांनी आवश्यक ते सहकार्य करावे. तसेच शासन व प्रशासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले सुचना, आदेश, निर्देश यांचे तंतोतंत पालन करुन जळगाव जिल्हयातील सर्व भाजीपाला बाजार/व्यवहार सुरळीतपणे सुरु ठेवण्यात यावे.
जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ठिकाणी भाजीपाला बाजारांचे लिलाव/व्यवहार पार पाडत असतांना कोणत्याही प्रकारे अनावश्यक गर्दी झाल्यास, सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास तसेच गर्दी होऊ नये याकरीता वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे, सुचनांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे भाजीपाला बाजारांचे लिलाव/व्यवहार तात्काळ बंद करण्यात येतील, याची सर्व संबंधितानी नोंद घ्यावी. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ. ढाकणे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.