यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील ५५ वर्षीय व्यक्तीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीला आले आहे. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रकाश दगडू पाटील (वय-५५) रा. किनगाव खुर्द ता. यावल असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
यावल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश पाटील हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १२ ऑक्टोंबर सायंकाळी ४ वाजेच्या दरम्यान प्रकाश पाटील हे घरातून कोणालाही काहीही न सांगता दारूच्या नशेत बाहेर निघून गेले. त्यांची पत्नी व नातेवाईकांनी त्यांच्या शोधाशोध केली असता कुठेही मिळून आले नाही. दरम्यान प्रकाश पाटील यांचे चुलत भाऊ जगन पाटील यांनी गावातील काही मंडळींना सोबत घेऊन किनगाव शिवारातील धनंजय तुकाराम महाजन यांच्या शेतातील विहिरीजवळ रात्री७ वाजता आले. त्यावेळी विहिरीच्या बाहेर बूट आणि तंबाखूची पुडी दिसून आले. त्यावरून गावातील एक जण विहिरीत उतरून पाहिले असता विहिरीच्या कपाऱ्या जवळ प्रकाश पाटील यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान प्रकाश पाटील यांनी विहिरीत उडी घेवून आत्महत्या का केली हे अजून स्पष्ट झालेले नाही. रात्री उशिरापर्यंत विहिरीतून मृतदेह काढून यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी जगन पाटील यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस कर्मचारी करीत आहे.