मुंबई प्रतिनिधी | क्रूझ पार्टी प्रकरणात काशीफ खान याच्या विरोधात कारवाई का करण्यात आली नाही ? असा प्रश्न पुन्हा उपस्थित करत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी आज पुन्हा व्हाटसऍप चॅटच्या आधारे नवीन गौप्यस्फोट केला आहे.
मुंबईतील ड्रग्ज क्रूझ पार्टी प्रकरणावरुन राष्ट्रवादी कॉंग्रसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधात सुरू केलेली आरोपांची मालिका अजूनही कायम आहे. नवाब मलिक यांनी आज आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी निगडीत आणि सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या केपी गोसावी याचे व्हॉट्सऍप चॅट्स उघड केले आहेत. यासोबत त्यांनी ऑडिओ क्लीप देखील जारी केल्या आहेत.
यातील एका ऑडिओ क्लिपमध्ये केपी गोसावी हा समीर वानखेडे यांच्या नावाचाही उल्लेख करत असल्याचं समोर आलं आहे. क्रूझवरील पार्टीत ठराविक व्यक्तींनाच टार्गेट करण्यासंदर्भात केपी गोसावी एका व्यक्तीसोबत चॅट्सवर बोलत असल्याचं दिसून येत आहे. केपी गोसावी आणि माहिती देणारा व्यक्ती कॉर्डिलिया क्रूझवरील पार्टीत ठराविक लोकांना अडकवण्यासाठीचं प्लानिंग करत असल्याचं या व्हॉट्सऍप चॅटमधून उघड होत आहे. ही समीर दाऊद वानखेडे यांची प्रायव्हेट आर्मी आहे आणि याची उत्तरं त्यांना द्यावीच लागतील, असं ट्विट नवाब मलिक यांनी केलं आहे.
यांनतरच्या पत्रकार परिषदेत मलीक म्हणाले की, मला एक व्हॉट्सऍप चॅट मिळालं. त्यानुसार व्हाईट दुबई नावाचा व्यक्ती आहे. त्याची माहिती या चॅटमधून दिली जात आहे. केपी गोसावी फोटो पाठवायला सांगतात. त्यानंतर काशिफ खानचा फोटो पाठवला जातो. ज्या प्रमाणे फोटोच्या आधारे लोकांना ओळख करून ताब्यात घेतलं गेलं. त्याच पद्धतीने काशिफ खानला अटक का करण्यात आली नाही? त्याला सेफ पॅसेज का दिला? तो क्रुझवर दोन दिवस काय करत होता? असा सवाल मलिक यांनी केला आहे. काशिफ खान हा गोव्यात लपून बसला आहे.
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे झोनल डायरेक्टर असताना त्यांच्याकडे गोव्याचा चार्ज होता. गोव्यात ड्रग्ज टुरिझम चालतं हे जगभरातील लोकांना माहीत आहे. रशियन माफीया हे ड्रग्जचं रॅकेट चालवतात. पण गोव्यात कोणतीही कारवाई होत नाही. कारण काशिफ खानकडून गोव्यात हे रॅकेट चालवलं जातं. काशिफ खान आणि वानखेडेंचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे काशिफवर कारवाई होत नाही. तुम्ही काशिफ खानला का बोलवत नाही? व्हाईट दुबईला का अटक झाली नाही? अशी माझी तुम्हाला विचारणा आहे, असं मलिक म्हणाले. एका कोर्टाने त्याला फरार घोषित केलं आहे. तरीही त्याला का वाचवलं जात आहे? असा सवालही त्यांनी केला.