जळगाव– भावाच्या लग्नाच्या पत्रिका देण्यासाठी शिरसोली येथून दुचाकीने शहरात आलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानाला भरधाव कारने उडविल्याची घटना मंगळवारी काव्य रत्नावली चौकात घडली.
तालुक्यातील शिरसोली दिपक मधुकर लोखंडे यांचे मोठे भाऊ दिनेश मधुकर लोखंडे यांचा 18 जानेवारी रोजी विवाह आहे. ते भिवंडी येथे पोलीस उपनिरिक्षक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी दिनेश लोखंडे हे जलसंपदा विभाग जळगाव येथे लिपिक म्हणून कार्यरत होते. येथील सर्व परिचितांना लग्न पत्रिका देण्यासाठी दिपक लोखंडे हे त्यांचा भाचा गणेश भारुडे यांच्या मंगळवारी दुचाकीने (एम.एच 19 सी.डी. 7584) शहरात आले होते. दुपारी 2 वाजेच्या सुमारास महाबळ येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयात काव्यरत्नावली चौकातून जाण्यासाठी वळण घेत असताना त्यांच्या दुचाकीला आकाशवाणीकडून महाबळ कडे जाणार्या भरधाव कारने (एम.एच 19 झेड 9900) लोखंडे यांच्या दुचाकी एका बाजूने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरुन फेकल्या गेल्याने जवान दिपक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर सोबतच्या गणेशला किरकोळ खरचटले. अपघातानंतर कारचालक कार सोडून घटनास्थळाहून पसार झाला होता. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार कारने मर्यादेपेक्षा जास्त वेगाने येत होती.
दरम्यान, घटनास्थळी सर्व लग्नपत्रिका पडल्याने नागरिकांनी त्यावरील संपर्क क्रमाकावर संपर्क साधला व अपघाताबाबत माहिती दिली. यादरम्यान एका रिक्षाने चालकाने माणुसकी दाखवित त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविले. अपघाताची माहिती मिळताच दिपक यांचा मोठा भाऊ दिनेश यांच्यासह नातेवाईकांनी सिव्हील गाठले. याठिकाणी येथून प्राथमिक उपचारानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे.