मुंबई : वृत्तसंस्था । कोरोनाच्या संकटानं पुन्हा एकदा डोकं वर काढल्यानं आषाढी पाठोपाठ कार्तिक यात्रेलाही वारकऱ्यांना माऊलीच्या दर्शनाविनाच राहावं लागणार आहे. कार्तिकी यात्रा काळात पंढरपुरात संचारबंदी लागू केली जाणार आहे. चार दिवस बस सेवाही बंद राहणार आहे.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी माहिती दिली.की दुसरी लाट येण्याची भीती असून, राज्य सरकारबरोबरच जिल्हा प्रशासनाकडूनही उपाययोजना केल्या जात आहेत. करोनाचा धोका टाळण्यासाठी पंढरपूरमध्ये पंढपूरमध्ये २२ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपासून २६ नोव्हेंबर रात्री १२ वाजेपर्यंत पंढरपूरकडे येणारी एसटी बसेसची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. २५ नोव्हेंबर रात्री १२ वाजेपासून एकादशीच्या रात्री १२ वाजेपर्यंत म्हणजेच २६ नोव्हेंबरपर्यंत पंढरपूर शहरासह परिसरातील ५ ते १० किलोमीटरपर्यंत संचारबंदी लागू केली जाणार आहे
ज्या भाविकांनी अथवा दिंड्यांनी पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण केलं असेल, त्यांनी परत जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. भाविकांना व दिंड्यांना सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरूनच परत पाठविण्यात येणार असल्याचंही झेंडे यांनी सांगितले. कार्तिकी यात्रा काळात कोणत्याही भाविकांनी मंदिरापर्यंत अथवा चंद्रभागेपर्यंत जाऊ नये, अशी माहिती त्यांनी दिली.
आज प्रशासनाने वारकरी संप्रदायांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. यात्रा काळात पंढरपुरात असणाऱ्या काही मोजक्या महाराज मंडळींना नियम पाळून चंद्रभागा स्नान व नगर प्रदक्षिणेला काही मूभा देण्याबद्दल सध्या प्रशासनाकडून विचार केला जात आहे.