चाळीसगाव, प्रतिनिधी । सध्या शेतीची कामे सुरु आहेत, प्रत्येक शेतकरी कामात व्यस्त आहे. मात्र एकीकडे आपण शेतकऱ्यांना जगाचा अन्नदाता म्हणतो मात्र दुसरीकडे त्याच शेतकऱ्याने पिकविलेल्या मालाला हमीभाव मिळत नाही, खरेदी केली जात नाही. या विरोधात शनिवार २० जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक सिग्नल पॉइंट आमदार मंगेश चव्हाण येथे ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.
चाळीसगाव तालुक्यात कापूस खरेदीसाठी ३०००, मका ज्वारी खरेदीसाठी १३०० हून शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. मात्र दीड महिना झाला तरी २५ टक्के सुद्धा शेतकऱ्यांचा कापूस, मका खरेदी झाली नाही. उलट शेतकऱ्यांच्या नावाखाली व्यापारी आणि पुढारी आपला माल तिथे खपवत आहेत म्हणून या क्वारंटाइन झालेल्या सरकारला जाग करण्यासाठी, शेतकऱ्याचे बोंड विकले जात असताना तोंड न उघडणाऱ्या प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी दि.२० जून शनिवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौंक सिग्नल पॉइंट येथे सकाळी १० वाजता आपण ठिय्या आंदोलन करणार आहोत. तरी आपण जास्तीत जास्त संखेने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी कापूस व मका – ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना केले आहे. भारतीय जनता पक्ष व आमदार मंगेश चव्हाण यांच्या अंत्योदय जनसेवा कार्यालयात झालेल्या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य उध्दवराव महाजन, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष के बी दादा साळुंखे, भाजप तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, पंचायत समितीचे गटनेते संजय भास्करराव पाटील, पं. स. सदस्य सुभाष पाटील, माजी नगरसेवक संजय घोडेस्वार, संघटन सरचिटणीस धनंजय मांडोळे, अमोल चव्हाण, महिला मोर्चा शहराध्यक्ष संगीताताई गवळी, डॉ. महेंद्र राठोड, शहर सरचिटणीस अमोल नानकर, जितेंद्र वाघ, योगेश खंडेलवाल, शहर प्रसिद्धीप्रमुख प्रवीण मराठे, माजी कार्यालय मंत्री अरुण पाटील, वाघळीचे सरपंच विकास चौधरी, रामकुमार पाटील, महादू चौधरी, किशोर रणधीर, अजयनल जोशी,जितेंद्र पाटील, चेतन पाटील आदींची उपस्थिती होती. बैठकीच्या सुरुवातीला दिवंगत माजी खासदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार वाहण्यात आला.
पुढे आमदार चव्हाण यांनी सांगितले की, मी लोकप्रतिनिधी या नात्याने मार्केट कमिटीकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी मागितली असता त्यांनी शेतकऱ्यांचे नाव, मोबाईल नंबर व गट नंबरसह यादी तात्काळ यादी दिली. मात्र शेतकी संघाकडे मागील ८ दिवसांपासून यादी मागत आहे पण त्यांनी फक्त शेतकऱ्यांचे नाव व गाव एव्हडीच यादी दिली. शेतकी संघाचे चेअरमन म्हणतात की आम्ही पारदर्शकपपणे काम करतो मग शेतकऱ्यांची माहिती ते का लपवत आहेत ? असा प्रश्न उपस्थित केला.