अमृतसर वृत्तसंस्था । मोदी सरकारने संमत केलेले तिन्ही कृषी कायदे हे काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर रद्द करणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा आज खासदार राहूल गांधी यांनी केली.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पंजाबमधील मोगा येथून शेती बचाव आंदोलनाची सुरुवात केली आहे. यावेळी शेतकर्यांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी नुकतेच संमत करण्यात आलेले कृषी कायदे हे शेतकर्यांच्या नव्हे तर भांडवलदारांच्या हिताचे असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, जर सरकारला हे कायदे संमत करून घ्यायचे होते तर सर्वात आधी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये त्यांच्याबाबत चर्चा व्हायला हवी होती. ज्या दिवशी काँग्रेस सत्तेवर येईल. त्याच दिवशी या तिन्ही कायद्यांना रद्द करून टाकेन.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, मी पंजाबमधील शेतकर्यांना विश्वास देऊ इच्छितो की, काँग्रेस देशभरातील शेतकर्यांच्या सोबत उभी आहे. काँग्रेस आपल्या आश्वासनापासून एक इंचही मागे हटणार नाही. मोदी सरकार एमएसपीला संपवू इच्छित आहे. तसेच शेतीचा सर्व बाजार अंबानी आणि अदानींना सोपवण्याची तयारी करत आहे. मात्र काँग्रेस पक्ष असे होऊ देणार नाही. जर शेतकरी या नव्या कायद्यांमुळे समाधानी असतील तर देशभरात शेतकरी आंदोलन का करत आहेत. पंजाबमध्ये शेतकरी आंदोलन का करत आहेत. तसेच कोरोनाकाळात हे तीन कायदे लागू करण्याची काय घाई होती, असा सवालही राहुल गांधी यांनी केला आहे.