मुंबई: वृत्तसंस्था । ‘काँग्रेस हा मोठा पक्ष आहे व आघाडीचे नेतृत्व मोठा पक्षच करतो. काँग्रेस हा एक विचार होता व काँग्रेससाठी लोक लाठ्या खायला तयार होते. काँग्रेसची हक्काची मतपेटी पूर्वीसारखी राहिलेली नाही. काँग्रेसलाच यावर तोड काढावी लागेल,’ असा सल्ला शिवसेनेनं दिला आहे.
यूपीएच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव चर्चेत आल्यापासून महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये चकमक सुरू आहे. यूपीएचा भाग नसतानाही शिवसेनेनं यूपीएच्या अध्यक्षपदासाठी पवारांच्या नावाचं स्वागत केल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी आहे. शिवसेनेनं यात पडू नये, असंही काही नेत्यांनी सुनावलं आहे. असं असतानाही शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून पुन्हा एकदा विरोधी पक्षाच्या मजबूत ऐक्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर, काँग्रेसच्या सद्यस्थितीकडंही लक्ष वेधलं आहे. त्यासाठी काही राज्यांतील बदलत्या राजकीय समीकरणांचे दाखलेही दिले आहेत.
यूपीएचे नेतृत्व कोणी करावे, हा वादाचा मुद्दा नाही. यूपीए भक्कम करावी व भाजपसमोर आव्हान उभे करावे, हा मुद्दा आहे. काँग्रेस पक्ष हे सर्व घडवून आणण्यास समर्थ असेल तर त्यांचे स्वागत आहे. आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाकडेच आघाडीचे नेतृत्व असते, हे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे योग्यच आहे. पण, मोठ्या पक्षाने जमिनीवर चालू नये. मोठी झेप घ्यावी, अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. देशात भाजपविरोधात असंतोषाच्या ठिणग्या उडत आहेत. लोकांना बदल हवाच आहे. त्याप्रमाणे पर्यायी नेतृत्वाची गरज आहे. ते कोण देऊ शकेल हा प्रश्न आहे. असे शिवसेनेचे म्हणणे आहे .
काँग्रेस आजमितीस नक्कीच मोठा पक्ष आहे. पण मोठा म्हणजे नक्की काय आकारमानाचा? काँग्रेसच्या खालोखाल तृणमूल, अण्णा द्रमुक असे पक्ष संसदेत आहेत व हे सर्व भाजप विरोधक आहेत. देशातील विरोधी पक्षात पोकळी निर्माण झाली आहे व विखुरलेला विरोधी पक्ष एका झेंड्याखाली एकत्र यावा, अशी अपेक्षा ठेवली तर काँग्रेसमधील मित्रांना ठसका का लागावा? असा प्रश्नही शिवसेनेने विचारला आहे
२०२३ ची निवडणूक आपला जनता दल सेक्युलर म्हणजे जेडीएस स्वतंत्रपणे आणि स्वबळावर लढविणार आहे. देवेगौडा हे काँग्रेसचे एकेकाळचे साथी. कर्नाटकात त्यांचे सुपुत्र कुमारस्वामी यांनी काँग्रेसबरोबर सरकारही स्थापन केले. पण आज या दोन पक्षांत दरी आहे. देवेगौडा यांच्या पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा फायदा शेवटी भाजपलाच होईल. देवेगौडा, कुमारस्वामींसारखे अनेक घटक राज्याराज्यांत आहेत. बिहारातील जदयुलाच सुरुंग लावून भाजप स्वबळावर मुख्यमंत्री बसविण्याच्या तयारीत आहे. बिहारात काँग्रेस, राजदसारख्या पक्षांचे आमदार फोडण्याची भाजपची योजना आहे.
हैदराबाद महानगरपालिका निवडणुकांचे निकाल भाजप विरोधकांचे डोळे उघडणारे आहेत. एकेकाळी ईशान्येकडील राज्यांतही काँग्रेस हा बलदंड पक्ष होता. आज चित्र बदलले आहे. ख्रिश्चन, आदिवासी मतदारांचे प्राबल्य असूनही ईशान्येत भाजपला मोठे यश मिळत आहे.
अरुणाचल प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात भाजपला १७१ तर काँग्रेसला ६ जागा मिळाल्या. इटानगरमध्ये प्रथमच निवडणूक लढविणाऱ्या जदयुला ९ जागा मिळाल्या. याचा अर्थ असा की, काँग्रेसचा परंपरागत मतदार इकडेतिकडे गेला आहे. या सगळ्या घडामोडी देशातील विरोधी पक्षाने गांभीर्याने घ्यायला हव्यात. काँग्रेस मोठा पक्ष आहेच. स्वातंत्र्य लढ्यात, स्वातंत्र्यानंतर देश घडविण्यात काँग्रेसचे योगदान मोठे आहे, पण तेव्हा काँग्रेसला समोर पर्याय नव्हता. काँग्रेसला दलित, मुसलमान, ओबीसींचा भक्कम पाठिंबा होता. आज ती स्थिती राहिलेली नाही.असे शिवसेनेने सांगितले आहे