जयपूर (वृत्तसंस्था) राजस्थानातल्या काँग्रेसमध्ये झालेले बंड जनतेसाठी दुर्दैवी आहे. काँग्रेस त्यांच्या घरातल्या भांडणाचा दोष भाजपाच्या माथी मारु पाहत असले प्रकार करणे त्यांनी सोडावे. काँग्रेसच्या अंतर्गत कलहाची किंमत राजस्थानच्या जनतेला मोजावी लागतेय ही बाब दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेत्या वसुंधरा राजे यांनी दिली आहे.
वसुंधरा राजे यांनी ट्विट करून यावर वक्तव्य केले आहे. काँग्रेसमधील अंतर्गत कलहामुळे राज्यातील जनतेला नुकसान भोगावे लागत आहे. हे दुर्भाग्याचे असल्याचे राजे यांनी म्हटले आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा राजस्थानमध्ये कोरोनामुळे ५०० हून अधिक बळी गेले आहेत, तर २८००० हून अधिक लोक बाधित झाले आहेत. याचबरोबर राज्यातील शेती टोळधाडीमध्ये नष्ट होत आहे. महिलांविरोधातील अत्याचारांनी सीमा ओलांडली आहे. राज्यामध्ये विजेचा मोठा प्रश्न आहे. या मोठ्या यादीपैकी काहीच समस्या आहेत. सरकारला याकडे लक्ष द्यायला हवे, कधीतरी लोकांचा विचार करा, असा टोला त्यांनी लगावला आहे. मात्र, वसुंधरा राजे यांनी गेहलोत सरकार किंवा सचिन पायलट यांच्यातील वादावर एकही शब्द काढलेला नाही.