अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कर्ज वसुली साठी घरी गुंड प्रवृत्तीचे लोक पाठवले म्हणून बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी १० जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता अमळनेर शहरातील न्यू प्लॉट भागातील फायनान्स कंपनीच्या कार्यालयात येवून तोडफोड केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील रहिवाशी तथा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रथमेश पवार यांनी बजाज फायनान्स कंपनीकडून पर्सनल लोन घेतले होते. त्याचा लोनचा एक हप्ता थकल्याने बजाज फायनान्स कंपनीचे वसूली विभागाचे कर्मचारी पवार यांच्या घरी गेले. त्यावेळी पवार यांच्या पत्नी घरी एकट्याच होत्या. त्यावेळी वसूली कर्मचारी यांनी दादागिरी केली होती. काही शेतकऱ्यांच्या देखील या संदर्भात तक्रारी आलेल्या होत्या. बाळासाहेबांची शिवसेनेचे संतप्त पदाधिकारी यांनी मंगळवारी १० जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास बजाज फायनान्स कंपनीच्या कार्यालयात येवून कार्यालयातील सामानांची तोडफोड केली. यावेळी कार्यालयातील कर्मचारी कार्यालय सोडून पळून गेले. कार्यालयातील खुर्च्या, टेबल आणि संगणक यांचे नुकसान करण्यात आले. याबाबत शाखा व्यवस्थापक विकास सुभाष पाटील यांनी माध्यमांशी या प्रकरणाबाबत बोलण्यास नकार दिला आहे. या घटनेमुळे अमळनेर शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत अद्याप पोलीसात नोंद करण्यात आलेली नाही.