नवी दिल्ली (वृत्तसंस्था) खासगी क्षेत्रातील बँक ‘येस बँके’ने अनिल अंबानी यांच्या मुंबईतील सांताक्रुज परिसरातील मुख्यालय ताब्यात घेतले आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समुहावर सर्व बँकांचे १२ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे.
येस बँकेने फायनान्शिअल एक्सप्रेसमध्ये दिलेल्या एका जाहिरातीत सांगितले, की बँकेने सांताक्रूजमधील (मुंबई) 21,000 चौरस फूटपेक्षा अधिक क्षेत्रफळाची मुख्यालय इमारत आणि दक्षिण मुंबईमधील नागिन महलमधील दोन मजल्यांचा ताबा घेतला आहे. उद्योगपती अनिल अंबानी गेल्या काही वर्षांपासून आर्थिक समस्यांचा सामना करत आहेत. या कारवाईबाबत यस बँकेने सांगितले की, रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चरला बँकेने २ हजार ८९२ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. आता त्या कर्जाच्या वसुलीसाठी ही प्रक्रिया क्रमवारपद्धतीने अवलंबणात आली आहे. दरम्यान, बँकेने नागिन महाल येथील रिलायन्सच्या कार्यालयाचे दोन मजले आपल्या ताब्यात घेतले आहेत. थकबाकीदाराची संपत्ती जप्त करून त्याची विक्री करून आपल्या कर्जाची भरपाई करण्याचा बँकेला अधिकार आहे, असे ही बँकेने स्पष्ट केले. अनिल अंबानी ग्रुपवर येस बँकेचं एकूण १२,००० कोटी रुपयांचे कर्ज आहे. अनिल अंबानी २००८ मध्ये जगातील सहावे श्रीमंत व्यक्ती होते. मात्र, टेलिकॉम, पॉवर आणि एंटरटेनमेंट सेक्टरमध्ये झालेल्या मोठ्या तोट्यामुळे त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर वाढताच आहे. दरम्यान, आपल्या संपत्ती विकावी लागली तरी चालेल पण आपण बँकांचं सर्व कर्ज फेडणार असल्याचं यापूर्वी अंबानींनी म्हटले होते.