कर्जतच्या भाजप नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

 

नगरः वृत्तसंस्था । पारनेरच्या शिवसेनेच्या नगरसेवकांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर आता कर्जत आणि जामखेडच्या भाजप नगरसेवकांनी राष्ट्रवादीची वाट धरली आहे. आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवशीच कर्जतमधील दोन नगरसेवकांसह भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. जामखेडमधील भाजपचे तीन नगरसेवक आणि कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

चार वर्षांपासून जामखेड नगरपरिषदेमध्ये भाजपचे सहयोगी सदस्य असलेल्या तीन नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. जामखेडचे उपनगराध्यक्ष महेश निमोणकर, मोहन पवार, राजेश वाव्हळ हे ते ३ नगरसेवक आहेत . राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. मधुकर राळेभात, माजी सभापती सुभाष आव्हाड, सुर्यकांत मोरे, तालुका उपाध्यक्ष दयानंद कथले, सतिष चव्हाण यावेळी उपस्थित होते.

नगरसेवक निमोणकर म्हणाले, ‘मी अपक्ष निवडून येऊन भाजपला बिनशर्थ पाठींबा दिला होता. विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री राम शिंदे यांचे काम केले होते. तरीही भाजपवाले मला त्यांचा समजत नव्हते. आमदार रोहीत पवार यांनी औद्योगिक वसाहत व शहराला करमाळा तालुक्यातील दहिगाव येथून होणारी पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी उचलले पाऊल पाहून आम्ही प्रभावीत झालो.’
या तीन नगरसेवकांनी टाकलेल्या विश्वासाचे पक्ष स्वागत करीत आहे. असे राळेभात यांनी सांगितले.

Protected Content