चाळीसगाव: प्रतिनिधी । कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने संचारबंदी लागू केलेली असताना शहरातील घाट रोड येथील कमल शांती पॅलेसमध्ये लग्न सुरू असल्याची माहिती मिळताच नगरपालिका व पोलिसांनी कारवाई करून व्यवस्थापनाला पंन्नास हजारांचा दंड ठोठावला
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १ मे पर्यंत राज्यात लाॅकडाऊनची घोषणा केलेली आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळता रेस्टॉरंट, हॉटेल, लग्न समारंभ व कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले आहे. पंचवीस जणांच्या उपस्थितीत लग्न लावण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
चाळीसगाव शहरातील घाट रोड वरील बोरा यांच्या मालकीचे कमल शांती पॅलेस मध्ये १६० जणांच्या उपस्थितीत लग्न लावण्यात येत असल्याची माहिती शहर पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना मिळाली. लागलीच नगरपालिका व पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने दुपारी कमल शांती पॅलेसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी ५०,००० हजार रुपयांचे दंड ठोठावण्यात आले. संजय सुदर्शन जैस्वाल ( रा. लासूर जि. औरंगाबाद ) यांनी पंन्नास हजार दंडाचा भरणा केला . हि कारवाई पोलिस उपनिरीक्षक महाविर जाधव, गणेश पाटील, संभाजी पाटील, सुनिल राजपूत, नगरपालिका कर्मचारी दिनेश जाधव, कुणाल महाले, जितेंद्र जाधव, सुमित सोनवणे, प्रविण तोमर व नगरपालिकेचे महसूल कर्मचारी शैलेश रघुवंशी आदींनी केली.